जळगाव जिल्ह्यातील तेजस महाजन हत्याप्रकरणी महाराष्ट्र माळी समाज महासंघ आक्रमक; ओबीसी नेते अनिल महाजन यांचे मुख्यमंत्र्यांना सखोल चौकशीसाठी निवेदन!

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय बालक तेजस महाजन याच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण माळी समाजात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र माळी समाज महासंघाने तात्काळ सखोल चौकशी करून उर्वरित आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊ महाजन यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन पाठवून या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे.
महाराष्ट्र माळी समाज महासंघाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तेजस महाजन याच्या हत्येप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी. महासंघाने अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात महासंघाच्या मुंबई कार्यालयातून अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशाने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात महासंघाने तेजसच्या कुटुंबाच्या पाठीशी एकनिष्ठपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
महासंघाने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, या प्रकरणात त्वरित कारवाई होऊन दोषींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करावे,पीडित कुटुंबाला न्याय मिळेल. समाजातील सर्व स्तरांतून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत असून, लवकरात लवकर चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई होण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र माळी समाज महासंघाने या प्रकरणात सरकारकडून तात्काळ आणि पारदर्शक कारवाईची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. तेजस महाजन याच्या कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी महासंघ कटिबद्ध आहे.