पाचोऱ्यात २९ जून रोजी सायबर क्राइम विषयावर रोटरी क्लबच्या पुढाकाराने व्याख्यान

पाचोरा, दि. २५ जून २०२५ (मधुर खान्देश वृत्तसेवा): रोटरी क्लब पाचोरा-भडगाव आणि जैन पाठशाळा, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने २९ जून २०२५, रविवारी “सायबर क्राइम” या विषयावर जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान सकाळी १० वाजता जैन पाठशाळेच्या सभागृहात, जामनेर रोड, पाचोरा येथे होईल.
पुण्यातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते सायबर सुरक्षा तज्ज्ञ डॉ. धनंजय देशपांडे सायबर सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या नियमां, कायद्यां, आणि सावधगिरीच्या उपायांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण आणि फसवणुकीच्या घटनांबाबत जनजागृती करण्यासाठी देशभर कार्यरत असलेल्या डॉ. देशपांडे या व्याख्यानात उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करतील.
या उपक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे आणि जैन पाठशाळेचे अध्यक्ष प्रफुल्ल संघवी यांनी पुढाकार घेतला आहे. पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक पवार यांचेही सहकार्य लाभले आहे. व्याख्यानानंतर श्रोत् यांच्या शंकांचे निरसन डॉ. देशपांडे करतील.
पाचोरा शहर आणि तालुक्यातील व्यापारी, उद्योजक, युवक-युवती, बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी आणि ग्राहकांनी या निशुल्क व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रवेश सर्वांसाठी खुला असून, जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, अशी विनंती करण्यात आली आहे.