भुसावळच्या तीर्थराज पाटीलने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

भुसावळ, दि. 28 जून 2025: थायलंड येथे आयोजित 7व्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले चॅम्पियनशिपमध्ये भुसावळच्या तीर्थराज मंगेश पाटील याने उत्कृष्ट कामगिरी करत दोन सुवर्णपदके आणि तीन रजत पदके पटकावली. एम टी एल इंडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केट, बँकॉक, थायलंड आणि रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 18 ते 19 जून 2025 दरम्यान झालेल्या या स्पर्धेत भारत, रशिया, थायलंडसह अनेक देशांतील स्केटर्सनी सहभाग घेतला होता.
8 वर्षे वयोगटातील इनलाइन आणि क्वाड्स स्केटिंग प्रकारात तीर्थराजने आपली चमक दाखवली. भुसावळच्या सिल्वर लाईन स्पोर्ट्स अकादमी आणि एन. के. नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी असलेल्या तीर्थराजला यशस्वी कामगिरीबद्दल बँकॉक येथे ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. त्याला प्रशिक्षक पियुष दाभाडे, दीपेश सोनार आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक भिकन अंबे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, शाळेच्या प्राचार्या अर्चना कोल्हे आणि क्रीडा शिक्षिका नम्रता गुरव यांनीही त्याला प्रोत्साहन दिले.
तीर्थराजच्या या यशाबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे, महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे, आमदार राजुमामा भोळे, खासदार स्मिताताई वाघ आणि भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील यांनी फोनद्वारे अभिनंदन केले. तीर्थराजच्या तळवेल आणि भुसावळ येथील घरी आनंदाचे वातावरण आहे.