पाचोर्यात भोंदूबाबाचा धुमाकूळ? स्थानिकांनी रंगेहात पकडले, पोलिस घटनास्थळी

पाचोरा, दि. २८ जून २०२५: कृष्णापुरी, पाचोरा येथील एका महाजन नावाच्या व्यक्तीच्या घरात व्यवसाय वाढीसाठी पूजा करण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने फसवणुकीचा प्रकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सतीश बाबा नावाच्या या भोंदूबाबाने, एका गुजराथी व्यक्तीसह काही जणांच्या मदतीने महाजन यांना पैसे, नवीन कपडे, बनियन आणि अंतरवस्त्र देऊन पूजा करण्याचे सांगितले होते. व्यवसायात प्रगती होईल, असे आमिष दाखवून त्यांनी हा प्रकार केला. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे या सूट बुटातील बाबाचा प्रकार उघडकीस आला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिस कर्मचारी योगेश पाटील, गणेश कुवर, शरद पाटील आणि होमगार्ड कपिल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत भोंदूबाबाला रंगेहात पकडले आणि पोलिस ठाण्यात नेले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, स्थानिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. नागरिकांनी अशा भोंदूबाबांच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबतची माहिती कृष्णापुरी येथील रोहित महाजन यांनी प्राथमिक स्वरूपात दिली आहे.






