जळगाव:एरंडोलमधील तेजस महाजन हत्या प्रकरण: माळी समाज महासंघाच्या पत्राची गृह मंत्रालयाने घेतली दखल, SIT स्थापन
मधुर खान्देश वृत्तसेवा | जळगाव, दि. २८ जून २०२५: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे १३ वर्षीय बालक तेजस महाजन याच्या हत्या प्रकरणात जलद आणि सखोल तपासासाठी महाराष्ट्र माळी समाज महासंघाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने तात्काळ कारवाई केली आहे. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ महाजन यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन तसेच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक, मुंबई पोलीस महासंचालक आणि गृह विभागातील प्रधान सचिव यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणात तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली होती.
महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या या आक्रमक भूमिकेची दखल घेत गृह मंत्रालयाने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश दिले. या पथकाला जलद गतीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच, फिर्यादींच्या दाव्यानुसार नरबळीचा संशय असल्याने याप्रकरणी वाढीव कलमे लावण्याचेही निर्देश स्थानिक ग्रामस्थांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत मागण्यांचे निवेदन दिले आहे. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ महाजन यांनी सांगितले की, “माळी समाजाच्या एकजुटीमुळे आणि संघटनेच्या ताकदीमुळे हे यश मिळाले. समाजाने एकत्र राहून आपल्या पुत्रासाठी न्याय मागितला आणि सरकारला कारवाईस भाग पाडले. यामुळे समाज संघटनेचे महत्त्व अधोरेखित होते.” त्यांनी सर्वांना एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकरणात SIT च्या स्थापनेमुळे तपासाला गती मिळेल आणि दोषींना लवकरात लवकर शिक्षा होईल, अशी आशा माळी समाज महासंघ आणि स्थानिक ग्रामस्थांना आहे.