पाचोऱ्यातील व्हीपी रोडवरील सुपडू भादू पाटील शाळेत वर्गातच शिक्षकाची आत्महत्या; घटनास्थळी पोलिसांची धाव!

पाचोरा, दि. २५ जून २०२५ (मधुर खान्देश वृत्तसेवा): पाचोरा शहरातील व्हीपी रोडवरील सुपडू भादू पाटील शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक रवींद्र भारत महाले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये शोक आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक पवार, सहायक पोलीस निरीक्षक श्री. निकुंभ, उपनिरीक्षक श्री. घायाळ, पोलीस हवालदार योगेश पाटील, कर्मचारी हरीश परदेशी, संतोष राजपूत आणि वाहनचालक संभाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जय मल्हार चालक बबलू मराठे, किशोर लोहार आणि अमोल पाटील यांनी मयत शिक्षकाला गळफासाच्या अवस्थेतून खाली उतरवले. शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर शिकवत असलेल्या वर्गाच्या समोरील वर्गामध्ये आत्महत्या केली असून सदर मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. रवींद्र महाले हे त्यांच्या बोलक्या स्वभावामुळे आणि चांगल्या व्यक्तिमत्त्वामुळे सर्वपरिचित होते. या घटनेमुळे शाळेत हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पाचोरा पोलीस याबाबत सखोल चौकशी करत आहेत.