1930 ला कॉल: सायबर फसवणुकीवर प्रभावी प्रथमोपचार;सायबर क्राईम या विषयावर डॉ. धनंजय देशपांडे यांचे मार्गदर्शन

पाचोरा, दि. ०१ जुलै २०२५: सायबर क्राइम हा भारतातील गंभीर प्रश्न बनला असून, दररोज लाखो लोक या फसवणुकीला बळी पडत आहेत. आधार कार्डचा स्वैर वापर धोकादायक ठरत असून, फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या क्रमांकावर अर्ध्या तासात संपर्क साधणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे, असे सायबर सुरक्षा तज्ञ डॉ. धनंजय देशपांडे यांनी पाचोरा येथील व्याख्यानात सांगितले.
रविवारी, २९ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता जैन पाठशाळा सभागृह, पाचोरा येथे रोटरी क्लब पाचोरा-भडगाव, जैन पाठशाळा आणि पाचोरा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने सायबर क्राइम जनजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सचिव डॉ. शिवाजी शिंदे, जैन पाठशाळेचे अध्यक्ष प्रफुल्ल शेठ संघवी, पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम आणि डॉ. मुकेश तेली उपस्थित होते.
दीपप्रज्वलन आणि मान्यवरांचा सत्काराने कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉ. शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले, तर पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. डॉ. पवनसिंग पाटील यांनी रोटरीच्या सेवाकार्यांचा आणि कार्यक्रमाच्या उद्देश्याचा उल्लेख केला.
डॉ. धनंजय देशपांडे यांनी दोन तासांच्या व्याख्यानात सायबर गुन्ह्यांच्या विविध पद्धतींवर प्रकाश टाकला. यामध्ये ऑनलाइन अंत्यसंस्कार सेवा, डिजिटल अरेस्ट, भावनिक आणि आर्थिक फसवणूक, परदेशी चलनाचा धाक, बोगस सरकारी जाहिराती, हनी ट्रॅप, आणि स्कॅनरद्वारे होणारी फसवणूक यांसारख्या शेकडो उदाहरणांचा समावेश होता. त्यांनी बचावासाठी खाजगी आणि व्यावसायिक व्यवहारांसाठी स्वतंत्र मोबाइल व ईमेल आयडी वापरणे, आधार कार्डचा वापर मर्यादित ठेवणे, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती टाळणे, आणि संशयास्पद लिंक्सवर क्लिक न करणे यासारख्या सूचना केल्या.
कार्यक्रमानंतर डॉ. देशपांडे यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. पाचोरा शहरातील नागरिक, युवक-युवती, महिला आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. मुकेश तेली यांनी आभार मानले. रोटरी क्लब आणि पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.