पाचोरा पीपल्स बँक निवडणूक: निलेश मराठे यांची उमेदवारी बँकेच्या हितासाठी; सहकार पॅनलच्या आरोपांना खोडून काढले

- तर आमदारांच्या उपस्थितीत सहकार पॅनलची पत्रकार परिषद संपन्न.
पाचोरा, 2 जुलै 2025: पाचोरा पीपल्स बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जनरल गटातील 9 जागांसाठी रंगतदार लढत होत आहे. सहकार पॅनलच्या 9 जागा बिनविरोध निवडून आल्या असताना, जनरल मतदारसंघातून निलेश विनायक मराठे यांनी माघार न घेतल्याने निवडणुकीची प्रक्रिया पुढे सुरू आहे. यामुळे बँकेला लाखो रुपये खर्च करावे लागणार असल्याचा आरोप सहकार पॅनलचे नेते ॲड. अतुल संघवी यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत जयकिरण प्रभाजी बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत केला. त्यांनी निलेश मराठे यांच्यावर वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा आरोप केला.
निलेश मराठे यांचे खंडन:
निलेश विनायक मराठे यांनी सहकार पॅनलचे आरोप खोडून काढताना आपली उमेदवारी बँकेच्या हितासाठी असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “ॲड. अतुल संघवी यांनी पत्रकार परिषदेत केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. मी वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी किंवा कर्ज, व्याज माफी यासाठी उमेदवारी करत नाही. माझे उद्दिष्ट बँकेच्या कारभारात पारदर्शकता आणि गरीब कर्जदारांना न्याय मिळवून देणे आहे. चेअरमन आणि संचालक मंडळाने बँकेच्या हितासाठी किती काम केले, हे मी तपासू इच्छितो.”
निलेश मराठे यांनी सर्व सभासदांना आवाहन केले की, त्यांनी ‘छत्री’ निवडणूक चिन्हावर मतदान करून आपल्याला संचालक म्हणून विजयी करावे. या प्रसंगी त्यांचे काका सुरेश मराठे, वडील विनायक मराठे आणि ॲड. शांतिलाल (बापू) सौंदाणे उपस्थित होते.
निवडणुकीचे चित्र:
निवडणूक जाहीर झाल्यावर सुरुवातीला बँकेची निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा होती. मात्र, 30 जून रोजी माघारीच्या शेवटच्या दिवशी निलेश मराठे यांनी जनरल गटातून माघार न घेतल्याने निवडणूक होणार आहे. सहकार पॅनलने मराठे यांच्या हेकेखोर भूमिकेमुळे बँकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, असा दावा केला आहे. तर मराठे यांनी आपली उमेदवारी बँकेच्या हितासाठी आणि सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी असल्याचा पुनरुच्चार केला.
येत्या 13 जुलै 2025 रोजी होऊ घातलेल्या या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, सभासदांचा कौल कोणाला मिळतो, हे लवकरच स्पष्ट होईल.