जळगावात प्रवासी रिक्षा चोरी करणाऱ्या टोळीला अटक, 5 रिक्षा जप्त!स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मधुर खान्देश वृत्तसेवा | जळगाव: जिल्ह्यात वाढत्या प्रवासी रिक्षा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) नाशिक आणि चाळीसगावमधून चोरीच्या 5 प्रवासी रिक्षा जप्त करत चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका विधी संघर्षित बालकाचाही समावेश आहे. या कारवाईत एकूण 2 लाख 30 हजार रुपये किमतीच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या.
पोलिसांची कारवाई आणि आरोपींची कबुली
जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (चाळीसगाव) आणि श्री. अशोक नखाते (जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी विशेष पथक तयार केले. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने पिंप्राळा हुडको, जळगाव येथील सादिक अली सय्यद (वय 40) आणि त्याच्या विधी संघर्षित पुतण्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी नाशिक आणि चाळीसगावमधून दोन रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. या दोन रिक्षा, प्रत्येकी 55 हजार रुपये किमतीच्या, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याशी (CCTNS क्र. 272/2025, कलम 303(2)) संबंधित जप्त करण्यात आल्या. सादिक अली याला चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपींकडून आणखी तिघांना अटक
सादिक अली याच्या माहितीवरून पथकाने पिंप्राळा हुडको परिसरातील नरेंद्र भिमराव अहिरे (वय 30), सुनिल गोकुळ भालेराव (वय 27) आणि शब्बीर सुपडू पठाण (वय 34) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन चोरीच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या, ज्यांची एकूण किंमत 1 लाख 20 हजार रुपये आहे. या रिक्षांचे इंजिन नंबर, चेसिस नंबर आणि आरटीओ नंबर वेगवेगळे असून, आरोपींकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 124 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस पथकाचे कौतुक
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक शरद बागल, पोउनि सोपान गोरे, सफी अतुल वंजारी, पोहेको सुनिल दामोदरे, अक्रम याकुब शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, पोको किशोर पाटील, रविंद्र कापडणे आणि चापोको महेश सोमवंशी यांच्या सहभागाने यशस्वीपणे पार पाडली. जळगाव पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





