पाचोऱ्यातील अनेक एटीएम बंद: शेतकरी व ग्राहकांची तारांबळ, बँक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

• बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागतोय आर्थिक भुर्दंड! पाचोऱ्यातील त्या सामाजिक संघटना गेल्या कुठे? पत्रकारांच्या माध्यमातून वरिष्ठांकडे करणार तक्रार दाखल.
पाचोरा, दि. २८ एप्रिल २०२५: पाचोरा शहर आणि परिसरातील बँकांच्या एकही एटीएम मशीनमधून पैसे उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिक, विशेषतः शेतकरी आणि इतर ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बँकांमधील केवायसी साठी आलेली गर्दी आणि एटीएममधील रोखीच्या कमतरतेमुळे अनेक शेतकरी बांधवांनी आपले आर्थिक व्यवहार करणे शक्य होत नसून संताप जनक प्रतिक्रिया शेतकरी आबा दगा पाटील,कृष्णापुरी यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांचे खरीप हंगामाच्या तयारीसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी त्यांना तातडीने पैशांची आवश्यकता असते मात्र पाचोऱ्यातील बहुतांश एटीएम “नो कॅश” चा फलक लावून बंद आहेत. सहकारी सोसायटींमधील खातेदारांना देखील आपले पैसे काढण्यासाठी बँकांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत, परंतु तिथेही रोखीचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर याचा मोठा परिणाम झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत बँक व्यवस्थापकांकडे तोंडी अनेक तक्रारी केल्या आहेत परंतु समाधानकारक उत्तर मिळत नाही “एटीएममध्ये पैसे टाकण्याची जबाबदारी बँकांची आहे, पण कोणीही याकडे गांभीर्याने पाहत नाही,” असे शेतकरी आबा पाटील यांनी सांगितले आहे. यासंदर्भात पाचोऱ्यातील बँक अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसून बोलाचा भात आणि बोलाची कढी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. एटीएममधील रोखीची नियमित उपलब्धता आणि बँकांमधील व्यवस्थापन सुधारण्यासाठी पावले उचलली गेली नाहीत, तर नागरिकांचा त्रास आणखी वाढण्याची भीती आहे.
मागणी:
नागरिकांनी मागणी केली आहे की, बँकांनी एटीएममध्ये नियमित रोख भरावी आणि शेतकरी तसेच ग्राहकांना पुरेशी रोकड उपलब्ध करून द्यावी. तसेच, बँक अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट धोरण आखून त्वरित उपाययोजना कराव्यात, जेणेकरून शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे हाल थांबतील असे मत नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. संबंधित बँक अधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेऊन तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी पाचोऱ्यातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा याविरोधात पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलार यांच्या वतीने देण्यात आला आहे.