पाचोरा व भडगाव तहसील कार्यालयात “महसूल दिन” उत्साहात साजरा

पाचोरा, दि. १ ऑगस्ट २०२५: पाचोरा तहसील कार्यालयात दुपारी ४ वाजता पाचोरा व भडगाव तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने “महसूल दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. उपविभागीय अधिकारी पाचोरा श्री. भूषण अहिरे साहेब होते. यावेळी तहसीलदार पाचोरा श्री. विजय बनसोडे, तहसीलदार भडगाव श्रीमती शितल सोलाट, जिल्हा परिषद सदस्य श्री. मधुभाऊ काटे, श्री. पदमबापू पाटील, लोहारा सरपंच श्री. अक्षय कुमार जयस्वाल यांच्यासह नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, पोलीस पाटील, शिपाई, महसूल सेवक, वाहन चालक आणि मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीताने झाली. यानंतर दोन्ही तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नायब तहसीलदार, सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, वाहन चालक, महसूल सेवक, शिपाई आणि मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षक यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी श्री. भूषण अहिरे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी विविध लाभार्थ्यांना लाभ मंजुरीचे पत्र वितरित करण्यात आले. तहसीलदार पाचोरा श्री. विजय बनसोडे यांनी कार्यक्रमाची माहिती सविस्तरपणे सांगितली. जिल्हा परिषद सदस्य श्री. मधुभाऊ काटे यांनी शुभेच्छा संदेशासह भाषण केले. उपविभागीय अधिकारी यांनी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळ अधिकारी श्री. आर. डी. पाटील यांनी केली, तर सूत्रसंचालन श्री. लोखंडे भाऊसाहेब यांनी आणि आभार प्रदर्शन श्री. बागुल आप्पा यांनी केले. या कार्यक्रमाला पाचोरा व भडगाव तालुक्यातील ८० ते ९० कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला आणि सर्वांनी महसूल दिनाचा उत्साह अनुभवला.