पाचोरा तालुक्याचा खरा दाता: मनोज शांताराम पाटील यांचा गरजूसाठी तत्काळ मदतीचा हात; कृष्णापूरीतील रुग्णांसाठी धावले! कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रु.

पाचोरा, दि. ८ जुलै २०२५ :पाचोरा तालुक्यातील सामाजिक बांधिलकी आणि परोपकारी वृत्तीचा आदर्श म्हणून एम.एस.पी. बिल्डकांचे मालक मनोज शांताराम पाटील यांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे. मधुर खान्देश या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून एका गरजू व्यक्तीच्या मदतीसाठी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत मनोज शांताराम पाटील यांनी तात्काळ पुढाकार घेतला. माध्यम संस्थेच्या आव्हानाची दखल घेत पाटील यांनी पत्रकार राहुल महाजन यांच्याशी संपर्क साधून डॉ. अभिजीत जगताप यांच्याकडून रुग्णाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती जाणून घेतली. रुग्णाला आर्थिक अडचणींमुळे वैद्यकीय खर्च परवडत नसल्याचे समजताच, मनोज पाटील यांनी तात्काळ मदत करण्याची तयारी दर्शवली. “रुग्णाला कुठेही हलवण्याची गरज नाही, त्यांना लागेल ती मदत मी करेन,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या परोपकारी कृतीबद्दल माळी समाज आणि हितचिंतकांनी मनोज पाटील यांचे मनापासून आभार मानले आहेत. याचवेळी, आरोग्य मित्र नितीन तायडे यांनीही तात्काळ मदत करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. तसेच, नुकतेच पाचोऱ्याहून बदली झालेले परशुराम दळवी यांनी ऑनलाइन फोन पे द्वारे १,००० रुपये मदत पाठवून आपला सहभाग दर्शवला. मनोज पाटील यांच्या या उदार कृतीने पाचोरा तालुक्यातील सामाजिक एकता आणि परोपकाराची भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.