पाचोरा शहरात इंस्टाग्रामवर रील बनवणाऱ्या तरुणांवर पोलिसांचा कडक कारवाईचा इशारा; दहशत निर्माण करणाऱ्यांची यादी तयार:पो.नि. राहुल कुमार पवार

- जळगाव जिल्ह्यात पोलिसच दादा…असा व्हिडिओ बनवून मागितली माफी….पोलिसांनीही दिली समज…
पाचोरा, दि. 11 जुलै 2025: पाचोरा शहरात सामाजिक माध्यमांवर दहशत आणि खुन्नस निर्माण करणारे रील्स बनवणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. अशा व्हिडिओमुळे तरुणांमध्ये आपापसात तणाव निर्माण होत असून, नुकत्याच बस स्टॅन्ड परिसरात घडलेल्या खून प्रकरणातही असेच रील बनवल्याचे समोर आले आहे. यामुळे पाचोरा पोलिसांनी खाकीचा रंग दाखवत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
https://www.instagram.com/reel/DL9SX3Eshni/?igsh=MWg2djlwNDVnbXFoOQ==
मागील आठवड्यात बस स्टॅन्ड परिसरात झालेल्या खून प्रकरणानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी आपल्या टीमसह शहरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि स्वतःला ‘भाई’ समजणाऱ्या इसमांची यादी तयार केली आहे. या यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तींवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुकवर दहशत आणि तणाव निर्माण करणारे व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अशा कृत्यांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद गोष्टींची माहिती तात्काळ पोलिसांशी 02596 240133 या क्रमांकावर संपर्क साधून कळवण्याचे आवाहन केले आहे.
पाचोरा पोलिसांनी समाजकंटकांवर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला असून, शहरातील नागरिकांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे.
सदर प्रकारामध्ये कारवाई करत असताना योग्य व्यक्तीवर तीच कारवाई व्हावी त्याचबरोबर इंस्टाग्राम वर किंवा फेसबुकवर वैयक्तिक आयुष्य तसेच कुणाच्या सांगण्यावरून कारवाई होत असेल तर ते चुकीचे होईल योग्य ती चौकशी करून पोलिसांनी कारवाया कराव्यात अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.