पाचोरा: पॉक्सो कायदा आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांवर मार्गदर्शनपर कार्यक्रम

पाचोरा, दि. 11 जुलै 2025: जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त पाचोरा विधी सेवा समिती आणि रोटरी क्लब पाचोरा-भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथे पॉक्सो कायदा तसेच विद्यार्थ्यांचे हक्क आणि अधिकार यावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी पॉक्सो कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी शाळेत रोटरी क्लबच्या पुढाकाराने इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमात तालुका विधी सेवा समितीच्या सदस्या ललिता पाटील, प्रकाश विसपुते, प्रा. डॉ. वैशाली बोरकर आणि रोटरी क्लबचे सचिव डॉ. अजयसिंग परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वकील संघाच्या उपाध्यक्षा सौ. कविता मासरे, सदस्य अंबादास गिरी, चंचल पाटील, रोटरी क्लबचे पदाधिकारी चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर, संजय कोतकर, डॉ. सिद्धांत तेली, सौ. अरुणा उदावंत उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक गणेश राजपूत, पर्यवेक्षिका स्नेहल पाटील यांच्यासह सुमारे 800 विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका या कार्यक्रमाला उपस्थित होते. इंटरॅक्ट क्लबच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे रोटरी क्लबतर्फे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जागरूकता निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.