शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा! शेतकरी सेनेच्या सुनील महाजन यांची तक्रार; तालुका कृषी अधिकाऱ्यांचा खत विक्रेत्यांना इशारा

पाचोरा:कृष्णापुरी, दि. १२ जुलै २०२५: शिवसेना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे खत आणि अवैध लिंक बॅग देण्याच्या प्रकाराबाबत गंभीर तक्रार नोंदवली आहे. यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांना कडक इशारा देत शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.
सुनील महाजन यांनी सांगितले की, काही दुकानदार शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीच्या खताच्या नावाखाली निकृष्ट माल आणि बेकायदा लिंक बॅग पुरवठा करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या तक्रारीची दखल घेत तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सर्व कृषी सेवा केंद्रांना सूचना दिल्या आहेत की, कोणत्याही प्रकारे निकृष्ट खत किंवा लिंक बॅगचा पुरवठा करू नये. असे करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, जर कोणताही दुकानदार निकृष्ट खत किंवा लिंक बॅग पुरवठा करत असेल, तर त्याची तात्काळ तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करावी. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभाग कटिबद्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांनी सतर्क राहून केवळ विश्वासार्ह आणि प्रमाणित कृषी सेवा केंद्रांमधूनच खते खरेदी करावीत, असे आवाहन सुनील महाजन यांनी केले आहे.