
गावात फेरफटका म्हणजे आमच्यासाठी केवळ फिरणे नव्हे, तर संधी असते.एखादं हरवलेलं बालपण पुन्हा शोधण्याची. ‘शाळाबाह्य सर्वेक्षण’ या नावाने ओळखली जाणारी ही मोहीम आमच्यासारख्या शिक्षकांसाठी एक पवित्र यज्ञ असतो असे वाटते.नित्यनेमाने गावात एक फेरी ही पालकांशी शैक्षणिक गप्पा मारण्यासाठी असते. 'शाळा आपल्या दारी' का तर कमवू तरच खाऊ अशी परिस्थिती बहुतांश पालकांची आहे. तसे तर आम्ही त्या गावाचे नाहीतच असेही चित्र इथे दिसते.आपण प्रयत्न करत रहावेत म्हणून घरोघरी शोध घेतल्यावर गावाच्या कोपऱ्यात अचानक रहायला आलेलं एक कुटुंब भेटलं आणि त्यात त्याच शोधात भेटला अशोक. लांब उभा, बारीकशा नजरांनी आमच्याकडे डोंगराच्या दगडा आडून पाहणारा.सलग तीन दिवस पिच्छा पुरवल्यावर त्याचा बाप भेटला.शिक्षण महत्त्व समजावून सांगितल्यावर त्यांनी पुढाकार घेत अशोकला गावातून आज मुलीसोबत पकडून आणले.त्याला नको भिती म्हणून त्यांच्या समोर असलेल्या दगडावर बसून घेतले. लाजरा दिसत असलेला मुलगा. त्याला आवाज दिल्यावर लाजत जवळ आला. विचारलं, “शाळेत येशील का?”
क्षणाचाही विलंब न लावता त्याचं उत्तर आलं,
“येसू ना!”
त्या छोट्याशा वाक्यात गढलेलं होतं एक स्वप्नं, एक इच्छा, आणि आमच्यासाठी मोठी प्रेरणा.
मुलाने होकार दिला म्हणजेच आधीचं सगळं समजावून झालं आहे, असं नव्हतं. त्याच्या पालकांशी संवाद साधला. कारण शोधले आणि ते नेहमीसारखंच सापडलं.
अशोकचे आई-वडील ऊसतोड मजूर.
पावसाळा सरताच घर सोडून ऊसाचे, कधी विटा-भट्टीचे ठिकाण गाठायचे.
तिथे तात्पुरती झोपडी, आणि पोरं सोबत. त्यांच्यासाठी पोट महत्त्वाचं शाळा दुय्यमच नव्हे, तर कधी नव्हतीच.या पालकांना दोष देणं सोपं असतं, पण त्यांचं वास्तव फार कठीण असतं.
अनियमित उत्पन्न, कामाच्या वेळा, सुरक्षिततेची चिंता आणि स्थलांतरामुळे बदलणारे ठिकाण या सगळ्यात मूल शाळेत कसं जाणार?.मुलगा होकार देतो म्हणजेच पालकांचं मन जिंकले असे नव्हते.त्यांच्याशी संवाद साधत होतो देवा आणि मी सातत्यानं.
त्याला जवळ करत,
“तुझं नाव काय?”
हलक्या आवाजात उत्तर आलं…
“अशोक”
खूप भारी वाटलं ऐकून. बालक पालक यांना आपल्या शाळेकडे आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणारी नेहमीची आयुधे वापरली.मस्त कटिंग करून उद्या शाळेत ये,असे सांगितले.
शिक्षक म्हणून आमचा प्रयत्नच असतो,शाळा मुलांपर्यंत नेण्याचा! त्यात असतात फक्त प्रयत्न.त्याला भेटल्यावर शाळेत येताना जिंकल्याची भावना होती. मुलाचं जीवन शिक्षणाने प्रकाशमान होईल ही आशा होती.विश्वास होता.
२००९ सालापासून भारतात ‘शिक्षणाचा हक्क कायदा’ (RTE Act) लागू झाला.६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळणं हा मूलभूत अधिकार आहे.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) नुसार,
‘प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहोचवणं आणि कोणतेही मूल शाळेबाहेर राहू नये’ हे उद्दिष्ट स्पष्टपणे मांडण्यात आलं आहे.हे पूर्ण करण्यासाठी शिक्षकाचा प्रत्यक्ष सहभागच निर्णायक ठरतो.
अशोकचे वडील म्हणाले,
“कटिंग करतो, चांगले कपडे घालतो, मग शाळेत आणतो?”
त्यांच्या नजरेत शिक्षणाचं महत्त्व दिसत होतं, पण हे अचानक आलं होतं का? वयानुरूप त्याला तिसऱ्या इयत्तेत त्याला घातलं.त्याची बहीण चौथीला अन् तो तिसरीला.बहीण इकडे आजीकडे म्हणून शाळेत दाखल.अशोकचे कुटुंब या वर्षी इकडे म्हणून मुलगा भेटला.नाहीतर असाच शिक्षणाविना राहिला असता की काय अशी भीती वाटून गेली.भेटलाही असता पण ही वेळ त्याची होती. संवादातून लक्षात आलेला अशोक आणि त्याच्या कुटुंबाची शिक्षणाविषयीची अनास्था हीच आमची लढाई होती. अशोकचं पहिलं वहिले पाऊल आमच्यासाठी ‘विजयाचा उत्सव’ होता.एका होकारामागे कित्येक प्रयत्नांची गोष्ट दडलेली होती.पोरगा दुसऱ्या दिवशी कटिंग अन् मस्त तयारी करून आल्यावर वाटलंच नाही की आपण याला काल भेटलो होतो.ती आनंदी होता.त्याला हे जग नवे वाटत होते.घेतला एक सेल्फी पोरासोबत.त्याला पुस्तक,वही,ड्रेस दिला.नवा करून टाकला.त्याला खूप खेळू दिलं पहिल्या दिवशी.
जगू दिलं मनासारखं.
कधीकधी मुलांचं हसणं, त्यांच्या डोळ्यातली चमक, पाहून उद्या येशील का ? या प्रश्नाला त्याने दिलेला,” मंग” प्रतिसाद या सर्वांतून शिक्षक म्हणून मिळणारी ‘समृद्धी’ अनुभवायला मिळते. शाळेबाह्य मुलांना पुन्हा शाळेच्या वळणावर आणणं हे केवळ शैक्षणिक काम नाही,तर हे एक संवेदनशील सामाजिक कार्य आहे.
ते करताना स्वतःचीही जाणीव बदलते, समज वाढते.एक शिक्षक म्हणून आपणही समृद्ध होत जातो. शाळेच्या उंबरठ्यावरचं स्वप्नं अशोकच्या रूपातून पूर्ण होत असल्याचं समाधान मिळते जेव्हा तो सकारात्मकरित्या प्रतिसाद देतो आणि शालेय प्रवाहात येतो तेव्हा.अशोक दररोज आता शाळेत येतोय. नवे मित्र त्याला मिळालेत. वहीत तो अक्षरे गिरवतोय.चित्र वाचन सहज करतोय. परिसरात मिळालेलं ज्ञान त्याला उपयुक्त ठरतंय.तो प्रतिसाद देतोय.
लवकरच ‘शाळा प्रवाहा’तून तो ‘वर्ग प्रवाहा’त येईल. असा विश्वास आहे.
भरत विठ्ठल पाटील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरधे ता. मालेगाव जि. नाशिक
9665911657