जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगावसह तीन उपविभागीय पोलीस अधिकारी पदे रिक्त

जळगाव, दि. १६ जुलै २०२५: जळगाव जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात सध्या तीन उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पाचोरा आणि चाळीसगाव उपविभागांचा समावेश आहे. पाचोरा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यकाळ जून २०२५ मध्ये पूर्ण झाला असून, त्यांच्या रिक्त पदावर अद्याप कोणत्याही नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. त्याचप्रमाणे, चाळीसगाव उपविभागातही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे.
सध्या पाचोरा आणि चाळीसगाव उपविभागांचा अतिरिक्त कार्यभार अनुक्रमे अमळनेर आणि चोपडा उपविभागातील अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि नियुक्ती प्रक्रियेत अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिवेशन संपल्यानंतर लवकरच या रिक्त पदांवर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्हा पोलीस दलाने यापूर्वी १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. अशा परिस्थितीत रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी तातडीने नियुक्त्या होणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.