पाचोरा-भडगावात अजित पवार आणि शरद पवार गटांना प्रभावी नेतृत्वाची गरज : बड्या नेत्याच्या प्रवेशाच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले?

पाचोरा, दि. १७ जुलै २०२५ : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या स्थापनेनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटींमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपने विकासाच्या मुद्द्यावर आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर महायुतीचे सरकार स्थापन केले, तर शिंदे गट आणि अजित पवार गटाचे आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. याउलट, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट सत्तेपासून दूर राहिला, तरीही राजकीयदृष्ट्या सक्रिय आहे.

पाचोरा-भडगाव मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे वर्चस्व आहे, तर भाजपचे अमोल शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी या देखील सक्रिय आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना (अजित पवार आणि शरद पवार) या मतदारसंघात प्रभावी नेतृत्वाचा अभाव जाणवत आहे. माजी आमदार दिलीप वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना प्रबळ चेहरा नसल्याने कार्यकर्ते सत्ताधारी पक्षांत सामील होताना दिसत आहेत.
सध्या जळगाव जिल्ह्यात, विशेषतः पाचोरा-भडगाव मतदारसंघात, अजित पवार गटात एक बडा नेता प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. हा नेता कोण असू शकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर असा प्रभावी नेता अजित पवार गटात सामील झाला, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) त्यांना मोठा राजकीय फायदा होऊ शकतो.
या मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे वर्चस्व कायम आहे, परंतु अजित पवार गटात बड्या नेत्याचा प्रवेश झाल्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. यामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. शरद पवार गटालाही प्रभावी चेहरा मिळाला, तर दोन्ही गटांमधील स्पर्धा तीव्र होऊन मतदारसंघातील राजकीय चित्र बदलू शकते. या घडामोडींमुळे पाचोरा-भडगावातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकीत कोणता गट बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.