पाचोऱ्यात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न

पाचोरा, दि. 25 जुलै 2025: श्री संत शिरोमणी बहुउद्देशीय मंडळ, भडगांव रोड, पाचोरा यांच्या वतीने रामदेव लॉन्स येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या सोहळ्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
सकाळच्या कार्यक्रमाची सुरुवात: सकाळी 7:30 वाजता सत्यनारायण महापूजेला प्रारंभ झाला. 7:30 ते 8:00 या वेळेत समाजबांधव सहकुटुंब उपस्थित होते. 8:30 वाजता सत्यनारायणाची आरती, महिलांचा हळदीकुंकू समारंभ आणि नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मंडळाचे अध्यक्ष श्री. योगेश सोनवणे आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा यांच्या हस्ते झाले. यानंतर मंडळाच्या पदाधिकारी आणि ज्येष्ठ सभासदांनी पूजा केली.
कीर्तन आणि प्रबोधन: सकाळी 9:30 वाजता ह.भ.प. योगेशजी महाराज धामणगांवकर यांनी आपल्या मधुर आवाजात नामदेव महाराजांचे बालपण, अध्यात्म आणि भक्ती यावर उदाहरणांसह प्रबोधन केले. पांडुरंगाच्या आरतीने कीर्तनाची सांगता झाली.
विवाह सोहळ्याचा अनोखा प्रसंग: सकाळी 11:00 वाजता मंडळाचे ज्येष्ठ दानशूर व्यक्तिमत्त्व श्री. भानुदास खैरनार (बाबा) यांच्या लग्नाला 60 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा स्मृतिप्रीत्यर्थ विवाहसोहळा आयोजित करण्यात आला. मंडळाच्या वतीने त्यांना नवीन वस्त्र देऊन, अंतरपाट धरून ब्राह्मण देवतेने मंगलाष्टके म्हणत विधिवत लग्न लावले. या भावपूर्ण प्रसंगी श्री. भानुदास खैरनार यांनी मंडळाला 60 हजार रुपयांची देणगी जाहीर केली. अंतरपाट श्री. अरुण आन्ना खैरनार आणि डॉ. दिलीप शिंपी यांनी धरला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार: यावेळी 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना श्री. जीवराज खैरनार यांनी ट्रॉफी, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ आणि नारळ देऊन सन्मानित केले. श्री. गिरीष जगताप यांनी आपले वडील कै. वसंत हरी शिंपी (जगताप) यांच्या स्मरणार्थ दिलेल्या 5000 रुपये फिक्स डिपॉझिटच्या व्याजातून 12वीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले.
उद्योजक आणि विद्यार्थ्यांचा गौरव: श्री. तुषार जीवराज खैरनार यांच्या टी.जे. एन्टरप्राइजेसच्या यशस्वी वाटचालीबद्दल मंडळाने त्यांचा सत्कार केला. तसेच कु. अबोली दादाभाऊ मांडगे हिने आय.आय.टी. पवई येथील शिक्षण उच्च गुणांनी पूर्ण करून भारत सरकारच्या 75 लाख रुपये शिष्यवृत्तीसह लंडन येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल तिचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय, चि. आदित्य जगदीश जगताप यांनी वयाच्या 22व्या वर्षी एम.बी.बी.एस. पूर्ण केल्याबद्दल डॉ. किर्ती शिंपी आणि डॉ. दिलीप शिंपी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सामाजिक उपक्रम: श्री. विकास नामदेव शिंपी यांच्या वरद पॅथॉलॉजी लॅबमार्फत रु. 7000/- किमतीच्या रक्त तपासण्या केवळ रु. 1600/- मध्ये उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली. समाजबांधवांना याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
नवीन कार्यकारणीची निवड: युवक मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. पीयुष दिलीप शिंपी आणि महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. रीना चेतन भांडारकर यांची सर्वानुमते निवड झाली.
अन्नदान आणि भोजन: यंदाचे अन्नदान श्री. भानुदास खैरनार (बाबा) यांनी केले. मटकी उसळ, मिक्स व्हेज, पुलाव, पोळी, पुरी, गरम मुंगभजी आणि अंगूर रबडी यांचा सर्वांनी आस्वाद घेतला. 2030 पर्यंतचे अन्नदाते यापूर्वीच निश्चित झाले असून, यंदा श्री. प्रकाश विष्णू नेरपगार, श्री. किशोर दिनानाथ निकुंभ आणि श्री. दिलीप पंडित सोनवणे यांनी 2033 पर्यंत अन्नदानासाठी नावे दिली.
सूत्रसंचालन आणि आभार: कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिलीप शिंपी आणि श्री. गिरीष जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. जनार्दन सोनवणे यांनी केले. सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला शोभा आणली.