पाचोरा शहरालगत असलेल्या गुरुदत्त नगर शेजारील शेतातील ११ बकऱ्यांवर हिस्र प्राण्यांचा हल्ला, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान.

पाचोरा, दि. २४ मे २०२५: पाचोरा शहरालगत असलेल्या गुरुदत्त नगर परिसरातील कृष्णापुरी शिवारात आज सकाळी हिस्र प्राण्यांनी शेतातील शेडमध्ये बांधलेल्या ११ बकऱ्यांवर हल्ला करत त्यांना फस्त केल्याची धक्कादायक घटना घडली. शेतकरी भूषण महाजन, पुरुषोत्तम महाजन आणि ललित अशोक महाजन यांच्या शेतातील बकऱ्यांचा यात समावेश आहे. या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती भूषण महाजन यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाचे अधिकारी प्रकाश देवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला. तसेच, पशुवैद्यकीय अधिकारी सुजाता सावंत यांनीही पंचनामा प्रक्रिया पूर्ण केली. जंगलातील हिस्र प्राण्यांचे वाढते प्रमाण पाहता, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वन विभागाने या प्रकरणी पुढील तपास सुरू केला असून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.