बांधकामाच्या ठिकाणी सोनं लपवले….पाचोरा येथील चोरीचा गुन्हा उघडकीस; आरोपी अटक, मुद्देमाल जप्त!

पाचोरा, दि. 28 जुलै 2025: पाचोरा शहरातील वृंदावन पार्क येथील अश्विनी राजेश डहाळे यांच्या घरातून 1,05,000 रुपये किमतीचा 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस आणि 1,500 रुपये रोख (500 रुपयांच्या तीन नोटा) असा एकूण 1,06,500 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 375/2025, भारतीय दंड संहिता कलम 305 (ए) अंतर्गत नोंद झाला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यात पाचोरा पोलिसांना यश आले असून, संशयित आरोपीला अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 27 जुलै 2025 रोजी दुपारी 12:00 ते 12:30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने अश्विनी डहाळे यांच्या घरातून हा मुद्देमाल चोरीला नेला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गजानन देशमुख (पोहवा/1328) यांनी सुरू केला. तपासादरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी रमेशकुमार शामलाल जांगीड (वय 49, रा. वार्ड नं. 3, ईसाडिया, ता. मादपुर, जि. सिकर, राजस्थान, ह.मु. एस.बी.आय. कॉलनी, पाचोरा) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी हा फिर्यादीच्या घरी फर्निचरचे काम करीत होता आणि घटनेनंतर तो पसार झाला होता.
पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेला मुद्देमाल एस.बी.आय. कॉलनीतील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लपवल्याचे सांगितले. पोलिसांनी दोन पंचांसमक्ष मेमोरँडम पंचनामा करून 1,05,000 रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस आणि 1,500 रुपये रोख असा एकूण 1,06,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला 27 जुलै 2025 रोजी सायंकाळी 18:55 वाजता अटक करण्यात आली असून, त्याला आज मा. न्यायालयात रिमांड अहवालासह हजर करण्यात येत आहे.
ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ), उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अरुण आव्हाड (पाचोरा भाग), आणि पोलीस निरीक्षक श्री. राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा.गजानन देशमुख, पो. कॉ. संदीप राजपूत, पो. कॉ. जितेश पाटील, पो. कॉ. हरीष परदेशी आणि पो. कॉ. कमलेश राजपूत यांच्या पथकाने पार पाडली.
पाचोरा पोलिसांनी तत्परतेने केलेल्या या कारवाईमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा विश्वास वाढला आहे.