छत्तीसगड पोलिसांच्या सायबर गुन्ह्यातील आरोपीला पाचोऱ्यातून अटक; पोलीसांची मदत

पाचोरा: छत्तीसगडमधील खैरागड, सुईखदान, गंडई येथील खैरागड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका गंभीर सायबर फसवणूक प्रकरणी (गु.नं. 476/2025) आरोपीला पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेऊन छत्तीसगड पोलिसांच्या हवाली केले आहे. हा आरोपी पाचोरा येथील सिंधी कॉलनीचा रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खैरागड पोलीस स्टेशन (जिल्हा खैरागड, सुईखदान गंडई, छत्तीसगड) येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा कलम 66D अन्वये गुन्हा दाखल आहे. हे दोन्ही गुन्हे प्रामुख्याने संगणकीय साधनांचा वापर करून व्यक्ती म्हणून फसवणूक आणि विश्वासघातक फसवणूक (Cheating) यासंबंधी आहेत.
सदर गुन्ह्यातील आरोपी गौतम परमानंद पंजाबी (वय 28, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) याचा शोध घेण्यासाठी छत्तीसगड पोलीस पथक पाचोऱ्यात आले होते.
पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या आदेशानुसार, पोलीस नाईक महेंद्र पाटील आणि पोलीस अंमलदार संदीप भोई यांनी तात्काळ कारवाई करत आरोपी गौतम पंजाबी यास त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीस नंतर छत्तीसगड पोलीस दलाचे उपनिरीक्षक शंकर करुणीक, टैलेश सिंह आणि आरक्षक 291 कमलकांत साहू यांच्या ताब्यात देण्यात आले. पाचोरा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आंतरराज्यीय गुन्हेगाराला पकडण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले आहे.





