आप्पा साहेब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यांना बिलकुल उमेदवारी देऊ नका? युवा तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांची ‘आप्पासाहेबांना’ भावनिक साद!

- पाचोरा भडगाव मतदार संघात भाजप-शिवसेना संघर्षात सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळणे अपेक्षित?
पाचोरा:संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे. याचे कारण म्हणजे येथील भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना शिंदे पक्ष यांच्यात थेट संघर्ष उफाळून आला आहे. महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आल्याने, स्थानिक राजकारण ढवळून निघाले असून, कार्यकर्त्यांनी विद्यमान आमदारांना भावनिक साद घातली आहे.
• तळागाळातील कार्यकर्त्यांची ‘आप्पासाहेबांना’ भावनिक साद!
शिवसेनेच्या एका गटाने आपल्या ‘आप्पासाहेब’ या नेतृत्वाला सूचित केले आहे की, आगामी निवडणुकीत उमेदवारी देताना धनशक्तीवर आधारित किंवा जोर करणाऱ्या उमेदवारांना बाजूला ठेवावे. शिवसेनेचे मूळ अस्तित्व हे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या एकजुटीत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला, तोच वारसा पुढे नेण्याची ही वेळ आहे.
- कार्यकर्त्यांचे स्पष्ट मत:”ज्या सामान्य कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली, आपल्याला तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी मदत केली, त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची ही वेळ आली आहे. ठेकेदारी करणाऱ्या आर्थिक बाबी मजबूत असलेल्या आणि ‘आम्हीच आमदार घडवले’ अशा बाता मारणाऱ्या पदाधिकाऱ्यांऐवजी निष्ठावान व सामान्य कार्यकर्ते तसेच नव्या युवा पिढीला उमेदवारी द्या.”
कार्यकर्त्यांनी या गोष्टीवर जोर दिला आहे की, काही ठेकेदार पदाधिकाऱ्यांमध्ये अशी चर्चा आहे की, ‘ते आर्थिक गणिते जुळवतात म्हणूनच आप्पा तिसऱ्यांदा आमदार आहेत’. अशा गैरसमज पसरवणाऱ्यांना दूर करून सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यास आप्पासाहेब कार्यकर्त्यांच्या मनातील भक्कम नेता म्हणून स्थान निर्माण करतील, यात शंका नाही.
- ‘भाजप’ला थेट आव्हान देणारे एकमेव नेतृत्व
पाचोरा मतदारसंघातील हे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टीला थेट आव्हान देणारे एकमेव आमदार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाला आणि कौशल्याला सामान्य नागरिकांनी स्वीकारले आहे. यामुळे, कार्यकर्त्यांना खात्री आहे की, विद्यमान नेतृत्व योग्य उमेदवारालाच संधी देऊन सामान्य शिवसैनिकाला न्याय देईल.
- वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि मंत्रिपदाची अपेक्षा
दरम्यान, १ नोव्हेंबर २०२५ रोजी होऊ घातलेल्या वाढदिवसानिमित्त ‘आप्पासाहेबांना’ कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, ‘आपण महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात एकदा तरी स्थान मिळवाल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला आहे आणि त्यासाठी आपण पात्र आहात’, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याची ही राजकीय रणधुमाळी भाजप विरुद्ध शिवसेना संघर्षामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळतो की धनशक्तीचा प्रभाव कायम राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





