पाचोऱ्यातील युवा उद्योजक शरद मराठे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश!

पाचोरा शहराच्या राजकीय वर्तुळात आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता पुन्हा भर पडली आहे. शहरातील नामांकित मराठे कुटुंबातील युवा उद्योजक शरद कैलास मराठे यांनी आज मुंबई येथे शिवसेना (शिंदे गट) पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला.शरद मराठे यांचा हा पक्षप्रवेश शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झाल्याची माहिती मिळाली आहे. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यवसाय असलेले शरद मराठे हे पाचोरा शहरातील एक परिचित चेहरा आहेत. शरद कैलास मराठे हे पाचोरा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष दिलीप श्रावण मराठे यांचे पुतणे आहेत. मराठे कुटुंबाचे विविध व्यवसायाच्या माध्यमातून पाचोरा शहरात आणि परिसरात चांगले सामाजिक तसेच व्यावसायिक वलय आहे. युवा उद्योजकाचा थेट सत्ताधारी पक्षात प्रवेश झाल्यामुळे पाचोरा शहराच्या आगामी राजकारणात या प्रवेशाचे काय परिणाम होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





