पाचोऱ्यात गोवंश कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनासह आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मधुर खान्देश वृत्तसेवा | पाचोरा, दि. १८ जून २०२५: पाचोरा शहरातील मोंढाळा रोडवर विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थांबविले असता यामध्ये गोवंश कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक वाहनासह एका आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. या कारवाईत चार गायी आणि एक लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे.
पाचोरा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलिस कर्मचारी योगेश पाटील आणि राहुल शिंपी १८ जून रोजी सायंकाळी ७:३० वाजता शहरात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, मोंढाळा रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षद हटकर, सचिन हटकर, शुभम घुले आणि रुपेश सोनार यांनी गोवंश वाहतूक करणारे वाहन (क्र. MH-47-Y-9076) अडवले आहे.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासणीत वाहनात तीन खिल्लार जातीच्या गायी आणि एक गावरान गाय, अशा एकूण चार गायी कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याचे आढळले. वाहनचालक इरफान इसा टकारी (वय ३०, रा. कुर्बानगर, बाहेरपुरा, पाचोरा) याच्याकडे परवाना, पशुवैद्यकीय प्रमाणपत्र किंवा खरेदीची पावती नसल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे आणि पोलीस कॉन्स्टेबल भोजराज धनगर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. जप्त मुद्देमालात तीन खिल्लार जातीच्या गायी आणि एक वाहन एकूण १,५५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोवंश हत्या थांबविण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे प्रखंड मंत्री योगेश सोनार, सहयोजक बंटी पाटील, प्रखंड गोरक्षा प्रमुख राहुल मधुकर पाटील, प्रचार प्रसिद्धी प्रमुख योगेश पाटील, गोकुळ पाटील, चेतन हटकर, शुभम घुले, सनी कलाल, हर्षल हटकर, सचिन हटकर आणि रुपेश सोनार यांचा सक्रिय सहभाग होता. जप्त केलेल्या गायींना स्थानिक गोशाळेत पाठवण्यात आले आहे.
पोलीस योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी इरफान टकारीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ९, ९(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस अधिकारी करत आहे.