नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – महिला सबलीकरणासाठी शासन कटिबद्ध! पालकमंत्री गुलाबराव पाटील


जळगाव : “स्त्री आरोग्यसंपन्न असेल, तर संपूर्ण कुटुंब आणि समाज निरोगी राहील. त्यामुळे महिलांसाठी आरोग्य शिबिरे आणि कायदेशीर मार्गदर्शन शिबिरे गरजेची आहेत. महिला दिन केवळ औपचारिकता नसून, हा त्यांच्या संघर्षाचा आणि यशाचा गौरव करण्याचा दिवस आहे. गेल्या काही वर्षांत स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन आणि अन्य योजनांमध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून आला आहे. ‘नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती’ आहे. महिला सबलीकरणासाठी शासन पुढील टप्प्यात अधिक योजना राबवणार आहे. त्यामुळे महिलांनी शिक्षण, उद्योग, विज्ञान, क्रीडा आणि समाजसेवेच्या प्रत्येक क्षेत्रात मोठी झेप घ्यावी,” असे आवाहन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

त्यांनी पुढे सांगितले की, “मुख्यमंत्री कन्यादान योजना, सुकन्या समृद्धी योजना, लाडकी बहीण योजना आणि महिला बचतगट अनुदान योजना यांसारख्या अनेक उपक्रमांद्वारे महिलांच्या सशक्तीकरणासाठी शासन ठोस पावले उचलत आहे.”

यावेळी जळगाव महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी आमदार राजूमामा भोळे, आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, उपआयुक्त धनश्री शिंदे, शहर अभियंता मनीष अमृतकर, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे आणि सुमित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी महिलांचे प्रत्येक क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. “स्त्री ही सर्वोच्च शक्ती असून ती शक्ती आणि शिस्तीचे प्रतीक आहे. महापालिका, राज्य आणि केंद्र शासन महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी शासनाची भक्कम साथ असेल,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महापालिका आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांनी जळगाव महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागांतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५ टक्के राखीव निधीतून राबवण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील यांनी केले, तर आभार उपयुक्त निर्मला गायकवाड-पेखळे यांनी मानले.

महिला सशक्तीकरणाचा भाग म्हणून शिष्यवृत्ती वाटप आणि क्रीडा प्राविण्य विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्याच्या योजनांचे उद्घाटन करण्यात आले. दहावी आणि बारावीमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तसेच महिला खेळाडूंना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली. पालकमंत्री पाटील यांनी जळगाव महानगरपालिका आणि महिला व बालकल्याण विभागाच्या उत्कृष्ट आयोजनाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पालकमंत्र्यांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित केले.

कार्यक्रमात महिला व बालकल्याण निधीतून २०२४-२५ मध्ये राबविण्यात येणाऱ्या २३ योजनांचे सादरीकरण करण्यात आले. यात शहरातील १३०० बालकांना पोषण आहार, दप्तर, वॉटर बॅग आणि खेळणी पुरवठा, शालेय विद्यार्थ्यांना दप्तर, टिफिन बॉक्स आणि वॉटर बॅग वाटप, महापालिकेच्या शाळांमध्ये लेझीम, चेस, कॅरम आणि इतर खेळाचे साहित्य उपलब्ध करणे, शुद्ध पाण्यासाठी आरो मशीन आणि वॉटर कुलर बसविणे, महिला बचत गटांसाठी व्यावसायिक रिटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यक्रम, दहावी आणि बारावीमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती, क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंना आर्थिक मदत, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे व सुरक्षा उपाययोजना, महिला आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री १०० दिवसीय कार्यक्रमांतर्गत आजच्या महिला दिनानिमित्त ५ महिलांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आली, तसेच महापालिकेतील विविध विभागांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १५ महिला कर्मचारी (लिपिक, शिपाई, डॉक्टर, आशा व सफाई कर्मचारी) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

महिला सशक्तीकरणासाठी पुढील आर्थिक वर्षात चार नवीन योजना राबवण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांना दिले. या योजनांमध्ये महिलांसाठी ‘पिंक ई-रिक्षा’साठी अर्थसहाय्य, महापालिकेच्या गाळ्यांपैकी ५% गाळे महिलांसाठी राखीव, महिला बचत गटांच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्ती अभियान आणि कापडी पिशवी निर्मिती, महानगरपालिका हद्दीतील हायस्कूल आणि कॉलेजमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन बसविणे यांचा समावेश आहे.

या नव्या योजनांमुळे जळगाव शहरातील महिलांना अधिक संधी मिळेल आणि त्यांचे सबलीकरण वेगाने होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button