खेडगाव नंदीच्ये श्री. एच. बी. संघवी हायस्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त वारकरी व ग्रंथ दिंडी उत्साहात संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित खेडगाव नंदीचे येथील श्री. एच. बी. संघवी हायस्कूलमध्ये दि. 5 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी दिंडी व ग्रंथ दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. विठ्ठल नामाची शाळा भरली या भावनेने संपूर्ण गाव विठूनामाच्या गजरात दुमदुमले.
सकाळी शाळेच्या प्रांगणातून सुरू झालेली ही दिंडी गावातील भजनी मंडळ, प्राथमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि माता-भगिनींच्या सहभागाने संपूर्ण गावात मार्गस्थ झाली. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि भजनांच्या तालावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट रिंगण प्रदर्शन सादर करून गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषाने गावातील वातावरण भक्तिमय झाले.
दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि गावातील भजनी मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. या दिंडीने आषाढी वारीची परंपरा जोपासत गावात भक्तीचा आणि एकतेचा संदेश दिला.