तात्यासाहेब आर.ओ. पाटील- एक प्रतिभावंत भूमिपुत्र! मेहताबसिंग नाईक, भडगाव

“बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” असा प्रत्येकाच्या हृदयात घर करून राहणारा आनंदयोगी म्हणजेच श्रद्धेय तात्यासाहेब आर ओ पाटील ! तात्यासाहेब खरोखरच धैर्याची व शौर्याची मूर्ती होते. तेजस्वी, ओजस्वी मनस्वी व यशस्वी जीवनाची स्फूर्ती होती. दुर्दम्य आत्मविश्वास, प्रखर बुद्धिमत्ता, द्रष्टेपण आणि विलक्षण वक्तृत्व प्रतिभा इत्यादी गुणांनी संपन्न असे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते.
तात्यासाहेबांनी भारतीय शेतीला जैविक युगाचा मंत्र दिला. त्यांनी कृषी विश्वाला समृद्धीचा निर्मल विचार दिला. त्यांचे अतुलनीय योगदान आणि विचार हे शेतीच्या जगताचे दस्ताऐवज आहे म्हणूनच तात्यासाहेब एक व्यक्ती नसून ते नाविन्यपूर्ण विचारांचे विद्यापीठ होतं. तात्या साहेबांचा संघर्ष म्हणजे त्यांनी रोवलेल्या क्रांती बीजाचे सतत दरवळणारे सुगंधी फुल आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारा त्यांचा जीवन प्रवास हा एक सामाजिक दस्तावेज आहे. सामाजिक जीवनाशी त्यांची शेवटपर्यंत बांधिलकी होती. त्यांचे विचार समाजनिष्ठ होते. त्यांचे विचार जितके वास्तविक होते तितकेच ते मौलिकही होते. विचारांच्या भव्यते सोबतच त्यांच्या कर्तुत्वाची दिव्यताही मोठीच होती. श्रेष्ठता असूनही अहंता नाही आणि राजकारणी असूनही सत्ता लालसा नाही. हे त्यांचे वैशिष्ट्य होते. देशातल्या शेतकऱ्यांना समृद्ध करणारे त्यांचे निर्मल बीज हे त्यांच्या प्रतिभेचे दिव्यत्व आहे.
तात्यासाहेब अशी एक आग होती की ज्यांनी आपल्या विचारांच्या प्रखर ठिणग्यातून अख्खा शेतकरी समाज जागवला. शेतीच्या आधुनिक शाश्वत जैवज्ञानाची सतत जाणीव करून देत त्यांना प्रज्वलित केले. राजकारण, अर्थकारण व समाजकारणातील आपल्या हक्काचा माणूस म्हणून ते जनांचा हुंकार बनले. आधुनिक शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी ज्ञानाची दिवे लागण करून अर्थातच निर्मल स्कूलची स्थापना करून ते आधुनिक शिक्षणाचे प्रणेते ठरले. समाज क्रांतीच्या मुल श्रोतातून व विचार संघर्षातून ज्वलंत झालेल्या या विचार रुपी अग्निफुलाचे नाव आहे- तात्यासाहेब आर ओ पाटील!
तात्यासाहेब पाटील हे जेवढे कोमल हृदयाचे होते तितकेच ते कणखर मनाचे होते. शून्यातून विश्व उभं करण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला त्याला कोणतीही परिसीमा नाही. यावरून त्यांची लढाऊवृत्ती प्रकट होते. त्यांच्या कर्तुत्वाचं क्षेत्र कृषी, समाजकारण, राजकारण आणि शिक्षण क्षेत्र होतं. तात्यासाहेबांनी आयुष्यभर शेतीची, शेतकऱ्यांची व समाजाच्या विकासाचीच आराधना केली. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी जे झपाटले पण लागतं त्याचा मूर्तीमंत आविष्कार म्हणजे तात्यासाहेब आर ओ पाटील होते. त्यांचे विचार आणि भाषणे ही कृषी प्रधान देशाविषयीच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेली असायची. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित व आधुनिक शेती या विषयाची कळकळ त्यांच्या प्रत्येक शब्दातून आणि कृतीतून व्यक्त व्हायची. त्यांनी शेतीचा नवा विचार मांडला. शेतकऱ्यांच्या कष्टाला अर्थ दिला. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांची प्रगती झाली. त्यांची वक्तृत्व शैली विलक्षण प्रभावी होती. त्यांच्या वाणीचे गारुड प्रत्येकाला प्रभावित करून टाकायचे. त्यांची समयसूचकता आणि हजरजवाबीपणा याना तोड नव्हती. ते आपल्या विनोद प्रचार भाषणांनी लोकांचे मन जिंकत होते.
तात्यासाहेबांचं नाव उच्चारलं की नजरेसमोर उभं राहत एक प्रसन्न, रांगडं, संवेदनशील आणि संवादी व्यक्तिमत्व ! आपल्या प्रखर बुद्धिमत्तेने अनेक वादळे त्यांनी परतून लावलीत. बोलता-बोलता आपल्या शब्दांना नर्मविनोदाची झालर लावून अंंतर्मुख करायला लावणारा एक प्रगल्भ नेता अशी त्यांची जनमानसात ओळख होती. निर्मल सीड्सच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रातच नव्हे संबंध देशभरातील असंख्य शेतकऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. विचारांचे भरभक्कम अधिष्ठान असणारे तात्यासाहेब हे कृषी विचारांचे केवळ पाईकच नव्हते तर शेतकऱ्यांचे ते चालते बोलते विद्यापीठ होते. शेतीच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधायचे. त्यांची शेती म्हणजे समस्त शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आधुनिक शेतीचे शक्तीपीठ होते.
आज अस्मानी सुलतानी संकटामुळे शेतकरी खचलाय. शेती पिकत नाही, उत्पन्न मिळत नाही, नफेखोरीच्या बाजारात चांगला आणि वाईट काय ? राजकारणातली माणुसकी हद्दपार होत आहे. सभ्यता हरवत आहे. हे सर्व बघतांना आठवण येते ती तात्या साहेबांच्या सुसंस्कृत माणसाची ! भ्रष्टाचाराला थारा न देणाऱ्या सत्वशील व्यक्तीची ! राजकीय असूनही काळा डाग न लागू देणाऱ्या नेत्याची ! शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या भूमिपुत्राची ! शेतकऱ्यांच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या पुरुषार्थाची!
तात्यासाहेब हे कृषी पंढरीच्या वाळवंटा मधले महान तपस्वी होते. कृषी जगताने त्यांचा अनेक पुरस्काराने सन्मान केला. तसेच त्यांचा राष्ट्रीय रत्न पुरस्काराने यथोचित गौरव ही केला आहे. त्यांच्या जाण्याने कृषी क्षेत्राला समर्पित झालेला एक आदर्श शेतकरी, कृषी तज्ञ, जाणकार संशोधक, आदर्श लोकप्रतिनिधी, आदर्श उद्योजक, आदर्श समाजसेवक, शिक्षण क्षेत्रातला एक महान रत्न गमावला आहे. पण समृद्धीचा विचार करणारे हे बीज मातीच्या कणाकणात रुजले आहे. मुठभर असणारे हे बीज खंडीभर झाले. एका दाण्यापासून हजारो दाणे अशा प्रकारे देशातल्या कृषी विश्वात व्यापले आहे. त्यामुळे तात्या साहेबांच्या समृद्ध विचारांचे अंकुरलेले कोंब भविष्याचे आव्हान स्वीकारून नव्या क्षमतेने, नव्या जोमाने तरारत आहे. अशा या बीज सम्राटाला जयंती दिनी विनम्र अभिवादन !






