संपादकीय:’कार्यकर्त्यांची निवडणूक’ आणि पाचोरा नगरपालिकेतील नेत्यांच्या नेतृत्वाची कसोटी! आमदार किशोर पाटील, मा.आ. दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी आणि अमोल शिंदे आपल्या कार्यकर्त्यांना कसा न्याय देणार? राहुल महाजन,संपादक (मधुर खान्देश)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. पाचोरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष,प्रभाग आणि नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता सर्वपक्षीय नेत्यांची खरी कसोटी सुरू झाली आहे: ती म्हणजे आपल्या एकनिष्ठ आणि लढवय्या कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी होण्याची संधी उपलब्ध करून देण्याची. प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वासाठी ही कार्यकर्त्यांच्या कामाची, निष्ठेची आणि त्यागाची पावती देण्याची वेळ आहे.
आमदार किशोर पाटील: निष्ठावंतांची प्रतीक्षा संपणार?
शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्यासाठी ही निवडणूक दुहेरी आव्हान घेऊन आली आहे. त्यांच्या आमदारकीसाठी नव्याने सक्रिय झालेल्या तरुण कार्यकर्त्यांनी तसेच अनेक वर्षांपासून खंबीरपणे उभे राहिलेल्या जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांनी नगरपरिषद निवडणुकीची वाट पाहिली आहे. आता आमदार पाटील यांना या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचा समतोल राखून संधी द्यावी लागणार आहे. मागील निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेले, पण आता कंत्राटदार-नेते म्हणून वावरणारे काही जण पुन्हा उमेदवारीच्या रांगेत आहेत. अशावेळी, नव्या जोशाला संधी देऊन पक्ष संघटना मजबूत करायची, की जुने आणि अनुभवी चेहऱ्यांना पुन्हा संधी द्यायची, हा आमदार पाटील यांच्यासाठी कळीचा प्रश्न असेल. त्यांच्या या निर्णयावर कार्यकर्त्यांची निष्ठा आणि पुढील राजकारणाची दिशा ठरेल.
अमोल शिंदे आणि भाजप: पराभवानंतर संधीचे राजकारण
भारतीय जनता पार्टीचे नेते अमोल शिंदे यांना आमदारकीत सलग दुसऱ्यांदा अपयश आले असले तरी, अनेक एकनिष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्यासोबत कायम आहेत. पराभवानंतरही नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या या कार्यकर्त्यांना शिंदे आता न्याय देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाच्या माध्यमातून तिकीट वाटप करताना अमोल शिंदे हे पक्षासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांचा राजकीय प्रवास सुरू करतील अशी अपेक्षा आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास आणि पाठिंबा कायम ठेवण्यासाठी, नेतृत्वाला त्यांना सक्रिय राजकारणात स्थान देणे आवश्यक आहे.
आयाराम-गयाराम आणि मूळ पक्षाच्या शिवसैनिकांचे भविष्य
पाचोरा राजकारणातील एक महत्त्वपूर्ण घडामोड म्हणजे वैशाली सूर्यवंशी यांचा भाजप प्रवेश. स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी आमदारकीच्या निवडणुकीत चांगली ताकद दाखवली होती. त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते भाजपमध्ये गेले असले तरी, ठाकरे गटाचे अनेक निष्ठावंत शिवसैनिक मूळ पक्षातच राहणे पसंत केले आहे. या ‘एकनिष्ठ’ राहिलेल्या शिवसैनिकांना आता वरिष्ठ पक्षश्रेष्ठी न्याय देणार* की त्यांना आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वासोबत काम करणे पसंत करावे लागेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे, मराठा समाजाचे प्राबल्य असलेले माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत भाजपमध्ये आले आहेत. अशा परिस्थितीत, वाघ यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना आता दिलीप वाघ यांच्या माध्यमातून भाजपमध्ये योग्य संधी मिळते का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे.
अंतिम कसोटी: कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षाचे बळ
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे निव्वळ सत्ताकारण नसून ते पक्ष संघटना मजबूत करण्याचे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे माध्यम असते. उमेदवारी देताना केवळ जिंकण्याची क्षमता न पाहता, कार्यकर्त्यांची निष्ठा, समर्पण आणि त्यांचा त्याग यांचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाला हे सिद्ध करावे लागेल की, त्यांच्या पक्षात ‘निष्ठा’ हीच सर्वात मोठी किंमत आहे. पाचोरा नगरपालिकेच्या या निवडणुकीत कोणते नेते आपल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांच्या श्रमाचा सन्मान करतात आणि पर्यायाने आपल्या पक्षाचे बळ वाढवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.






