पाचोरा: प्रभाग क्र.३ मध्ये नव्या चेहऱ्यांमुळे निवडणुकीत रंगत निर्माण होणार? की,जुन्याचा लोकप्रतिनिधींना पसंती देणार का याकडे लक्ष!

राहुल महाजन,संपादक | पाचोरा नगरपरिषद निवडणुकीची नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या पदांची सोडत जाहीर झाल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. विशेषतः अनेक नव्या आणि उत्साही कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीबद्दल उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बदललेल्या राजकीय परिस्थितीत, कृष्णापुरी, त्र्यंबक नगर, बहिरम नगर आणि वरखेड नाका परिसरातील प्रभाग क्रमांक ३ हा चर्चेत आला आहे. मागील निवडणुकीत या प्रभागावर विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या नगरसेवकांचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र, गेल्या नऊ वर्षांच्या काळात शहराच्या राजकारणात आणि या प्रभागाच्या सामाजिक स्तरावर मोठे बदल व घडामोडी झाल्या आहेत. त्यामुळे यावेळी हे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये यावेळी अनेक नवे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. हे कार्यकर्ते विविध पक्षांचे प्रतिनिधित्व करत असून, त्यांनी नगरसेवक लोकप्रतिनिधी होण्यासाठी आपली जोरदार तयारी दर्शवली आहे.
निवडणुकीसाठी इच्छुक असणारे प्रमुख दावेदार:
- सुनील महाजन,शिवसेना पक्ष (कृष्णापुरी)
- अतुल महाजन,शिवसेना पक्ष (गुरुदत्त नगर)
- अशोक निंबाळकर (शिवसेनेचे जुने कार्यकर्ते)
- ॲड. अविनाश सुतार,भाजपा(दिलीप वाघ गट),त्र्यंबक नगर
- प्रशांत पाटील (शिवसेना ठाकरे गट,त्र्यंबक नगर)
- रवी पाटील,शिवसेना शिंदे गट (कृष्णापुरी)
- संजय एरंडे,शिवसेना शिंदे गट(गाडगेबाबा नगर)
- सतीश चेडे, शिवसेना शिंदे गट (माजी नगरसेवक,बहिरम नगर)
- लक्ष्मण पाटील,भाजपा (अमोल शिंदे यांचे समर्थक,कृष्णापुरी)
- महेश पाटील,शिवसेना शिंदे गट(त्र्यंबक नगर)
या सर्व इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. या प्रभागातील मतदार यावेळी सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी विचारात घेऊन कोणत्या उमेदवाराला न्याय देणार? याकडे आता संपूर्ण पाचोरा शहराचे लक्ष लागून आहे.





