जळगाव जिल्हयासाठी शेतसुलभ योजनेची कार्यप्रणाली (SOP) “शेतकऱ्यांसाठी सुलभता, शेतीसाठी समृध्दी”
मधुर खान्देश वृत्तसेवा: जळगाव जिल्हाधिकारी यांनी दि. १७ एप्रील २०२४ चे अशासकीय पत्रान्वये महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ दिनांक ०८ ऑगस्ट २०२३ च्या अधिसुचनेनुसार जळगाव जिल्हयातील ७/१२ च्या इतर हक्कातील “तुकडा” शेरे कमी करण्यासाठी शेतसुलभ योजना अंतर्गत कार्यप्रणाली तयार करण्यात आलेलो आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे हस्तांतरण, विक्री आणि इतर व्यवहार सुलभ व्हावेत, तसेच शेतजमिनीचा उत्पादक वापर वाढावा यासाठी शेतसुलभ योजना राबविली जात आहे. ही योजना महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ वर आधारित आहे. दिनांक ८ ऑगस्ट २०२३ च्या अधिसूचनेनुसार जळगाव जिल्ह्यासाठी जिरायत जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र २० आर आणि बागायत जमिनीचे १० आर निश्चित करण्यात आले आहे. यानुसार, प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे तुकडे वगळता, सातबारा वरील “तुकडा” शेरे कमी करण्यासाठी ही सविस्तर कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हयातील शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी सर्व संबंधितांनी या योजनेस सहकार्य करावे. ही योजना केवळ शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या सातबाराच्या इतर हक्कांतील “तुकडा” शेरे कमी करण्यासाठी आहे. न्यायालयात प्रलंबित किंवा मालकी वाद असलेल्या जमिनीसाठी ही प्रक्रिया लागू नाही. तसेच यापूर्वी तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करुन झालेल्या व्यवहारांचे गटांवर या परिपत्रकान्वये कार्यवाही करण्यात येणार नाही तसेच सातबारा वरील “तुकडा शेरे कमी करून शेतजमिनीचा उत्पादक वापर वाढवणे व शेतकऱ्यांना जमीन हस्तांतरण, विक्री आणि इतर व्यवहारात येणारे अडथळे दूर करणेचे हेतुने जळगाव जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या तुकड्यांचे शेरे काढून टाकणे कामी खालील प्रमाणे नियोजन केले जाणार आहे. संबंधीत गावाचे ग्राम महसुल अधिकारी हे गावातील सर्व सातबारा उतारे तपासुन तुकडा शेरा असलेल्या गटांची यादी करणार आहे. त्यानुसार संबंधीत गावाचे मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडुन प्राप्त प्रस्तावाची सखोल तपासणी करणार असुन, सदर तपासणी नंतर तहसिलदार हे पात्र जमिनीसाठी “तुकडा” शेरे कमी करण्याचा आदेश पारीत करणार आहे. याबाबतची माहिती पत्राद्वारे तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिली आहे. (शासनाची नागरिकांच्या हिताची विविध माहिती ही वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन शहरातील पत्रकारांना प्रसिद्धीसाठी देण्यात यावी नुसतं सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडीएफ टाकून प्रकाशित करणे योग्य नाही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती देण्यासाठी प्राधान्याने पत्रकारांना विश्वासात घ्यावे अशी प्रतिक्रिया जेष्ठ पत्रकार आबा सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.)