पाचोरा: जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे महिलांचा गौरव!नगराध्यक्षा सुनिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती; महिलांच्या कर्तबगारीचा जागर

पाचोरा: जागतिक महिला दिनानिमित्त पाचोरा येथील माऊली बहुद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पाचोरा नगरीच्या प्रथम नागरिक व लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनिता किशोर आप्पा पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा सुनिता पाटील यांनी महिलांचे समाजातील योगदान आणि त्यांच्या सशक्तीकरणावर भर दिला. त्या म्हणाल्या की, “आज महिलांनी शिक्षण, उद्योग आणि सामाजिक कार्य अशा सर्वच क्षेत्रांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. समाजाच्या प्रगतीत स्त्रियांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे.” महिलांनी आता अधिक आत्मविश्वासाने पुढे येऊन समाज उभारणीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे संस्थेतील ज्येष्ठ महिलांचा करण्यात आलेला विशेष सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिलांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सन्मानाने भारावलेल्या ज्येष्ठ महिलांच्या चेहऱ्यावर यावेळी वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. या सोहळ्याला माऊली बहुद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे परिसरात चैतन्याचे आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





