पाचोरा: जागतिक महिला दिनानिमित्त ‘मुरलीधर अभिमान सराफ’तर्फे फौजी पत्नींचा गौरव

पाचोरा: येथील प्रतिष्ठित सुवर्ण पेढी मे. मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एक आगळावेगळा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या पत्नींचा (वीरपत्नी) विशेष सन्मान व गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुनिता किशोर आप्पा पाटील उपस्थित होत्या. त्यांच्या शुभहस्ते उपस्थित सर्व फौजी पत्नींना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन आदरपूर्वक गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सुनिता पाटील म्हणाल्या की:
“देशसेवेसाठी सीमारेषेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या सैनिकांइतकाच, त्यांचा परिवारही पडद्यामागे राहून मोठा त्याग करत असतो. पती देशसेवेत असताना घराची आणि मुलांची पूर्ण जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या सैनिकांच्या पत्नींचे धैर्य आणि समर्पण समाजासाठी खरोखर प्रेरणादायी आहे.”
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी भरभरून कौतुक केले. महिला दिनाच्या निमित्ताने झालेला हा गौरव सोहळा अत्यंत भावूक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला. या यशस्वी आयोजनाबद्दल संचालक मयूर सोनार यांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.




