सत्तेच्या समीकरणात विरोधकांची भूमिका किती महत्त्वाची? संपादकीय : राहुल महाजन,मधुर खान्देश वृत्तसेवा

सध्याच्या भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील समतोल हा लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सत्ताधारी पक्ष आपल्या ध्येयधोरणांद्वारे जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विकासकामे राबवण्यासाठी विविध निर्णय घेत असतात. परंतु, या निर्णयांचे मूल्यमापन करणे, त्यातील त्रुटी दाखवणे आणि जनहिताला प्राधान्य देण्यासाठी सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरणे हे विरोधकांचे प्रमुख कर्तव्य आहे. सध्या मात्र, देशात आणि राज्यात सत्तेचे समीकरण एकतर्फी दिसून येत असून, विरोधकांची भूमिका प्रभावीपणे समोर येत नसल्याने विरोधकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्ताधारी पक्षांकडून अनेक विधेयके आणि निर्णय घेण्यात आले आहेत. परंतु, या निर्णयांविरुद्ध विरोधकांनी ठोस आणि आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत नाही. विरोधकांचा आवाज दबला आहे की त्यांनी सोयीचे राजकारण स्वीकारले आहे. असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. विरोधकांचे हे निष्क्रिय वर्तन लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक आहे. सत्ताधारी पक्ष कितीही प्रबळ असले, तरी त्यांच्या प्रत्येक निर्णयाला तपासणारी आणि जनहितासाठी आग्रही भूमिका घेणारी विरोधी पक्षाची यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर टीका करणे, पर्यायी दृष्टिकोन मांडणे आणि जनतेच्या हितासाठी लढणे अपेक्षित आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत विरोधकांची ही भूमिका गहाळ दिसते.
महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, विरोधकांची भूमिका आणि त्यांचे राजकीय अस्तित्व याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधकांनी केवळ सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखवण्यापुरते मर्यादित न राहता, रचनात्मक पर्याय आणि ठोस उपाययोजना मांडण्याची गरज आहे. सध्या विरोधकांची अवस्था ‘बोलाचा भात आणि बोलाची कडी’ अशी झाली आहे. कोणत्याही महत्त्वाच्या घटनेचा निषेध करण्यात किंवा सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यात विरोधक कमी पडताना दिसतात. यामुळे जनतेमध्येही निराशा निर्माण होत आहे.
लोकशाहीत विरोधक हे सत्ताधाऱ्यांइतकेच महत्त्वाचे असतात. सत्ताधारी पक्षाला जनहिताच्या मार्गावर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या निर्णयांना जनतेच्या दृष्टिकोनातून तपासण्यासाठी विरोधकांची सक्रिय आणि आक्रमक भूमिका आवश्यक आहे. जर विरोधकांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही, तर सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता वाढते आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताला बाधा पोहचते यात मात्र शंका नाही. महाराष्ट्रातील विरोधकांनी आता स्वतःच्या भूमिकेचा आत्मपरीक्षण करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आगामी निवडणुकीत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना खऱ्या अर्थाने आव्हान द्यावे आणि लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत आपली सक्रिय सहभागिता दाखवावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.