पाचोरा: युवा सामर्थ्य फाउंडेशनकडून शाळेत वह्या-पेन वाटप, शिक्षणाला प्रोत्साहन

पाचोरा, दि. ३० जून २०२५: “शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे ज्याचा उपयोग तुम्ही जगाला बदलण्यासाठी करू शकता,” या उक्तीला सार्थ ठरवत युवा सामर्थ्य फाउंडेशन, पाचोरा यांच्या वतीने आज जिल्हा परिषद मराठी शाळा, सिंधी कॉलनी येथे विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन वाटप करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष इंजिनिअर उमेश उर्फ बंटी हटकर यांच्या नेतृत्वाखाली हा समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
युवा सामर्थ्य फाउंडेशन नेहमीच सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी अग्रेसर आहे. यापूर्वीही फाउंडेशनने वाचनालय, सेवा केंद्र यांसारखे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. या वाटप कार्यक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष इंजि. उमेश हटकर, ॲड. राजेंद्र वासवानी, शिवाजी हटकर, यश मोरे, पंकज पवार, आकाश केसवानी, जितेश नागरानी यांच्यासह शाळेचे शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शिक्षण हा वाघिणीचे दूध जो पिला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही… म्हणून शिका,” या भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी इंजि. बंटी हटकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वॉटर प्युरिफायर आणि सामान्य ज्ञानाची पुस्तके देण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी नवचैतन्य निर्माण झाले असून उपस्थितांनी फाउंडेशनच्या या कार्याचे कौतुक केले.