“नवतेजस्विनी महोत्सवा”चे भव्य उद्घाटन – महिला सक्षमीकरणाला नवा संकल्प

जळगाव : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), जिल्हा कार्यालय जळगाव यांच्या वतीने आयोजित “नवतेजस्विनी महोत्सवा” चे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कुर्बान तडवी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. हा महोत्सव माविमच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. १५ मार्च ते १७ मार्च २०२५ या कालावधीत शानभाग सभागृह, एम. जे. कॉलेज चौफुली, प्रभात चौक, जळगाव येथे सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान भरविण्यात आला आहे.

● महिला उद्यमशीलतेला चालना
माविमच्या “नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा” अंतर्गत बचत गट उत्पादित वस्तूंचे ५० स्टॉल्स या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत. महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, रेडिमेड कपडे, सेंद्रिय मसाले, अगरबत्ती, पारंपरिक आणि आधुनिक दागिने अशा विविध वस्तू येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
उद्घाटनप्रसंगी डॉ. हेमंत बाहेती (प्रमुख शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र), प्रणव झा (अग्रणी बँक व्यवस्थापक), शैलेश पाटील (विभागीय सल्लागार, माविम नाशिक विभाग), सुमेध तायडे (जिल्हा समन्वय अधिकारी, माविम जळगाव), उल्हास पाटील (सहायक जिल्हा समन्वय अधिकारी, माविम जळगाव) यांच्यासह माविम जिल्हा स्टाफ व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जिल्हा समन्वय अधिकारी सुमेध तायडे यांनी प्रस्ताविक करताना सांगितले की, महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्यांच्यात विक्री कौशल्य विकसित व्हावे, यासाठी माविमने हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
मुख्य मार्गदर्शक कुर्बान तडवी यांनी महिलांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उन्नती योजना (PMFME) अंतर्गत ३५% अनुदानाचा लाभ घेऊन पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि अन्न प्रक्रिया उद्योग वाढवण्याचा सल्ला दिला. महिलांनी व्यवसाय केवळ प्रदर्शनापुरता मर्यादित न ठेवता वर्षभर तो पुढे न्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महिलांचे अनुभव आणि प्रेरणा
मागील वर्षी प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिलांनी आपले यशस्वी अनुभव मांडले आणि या उपक्रमामुळे व्यवसायवृद्धीस कसा हातभार लागला, हे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजयकुमार स्वामी यांनी केले.
आरोग्य तपासणी आणि नागरिकांचे आवाहन
प्रदर्शनात गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने महिलांसाठी आरोग्य तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. जळगावकर नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी यांनी केले आहे.