समाजकारण, राजकारण व उद्योगक्षेत्रातील तारा हरपला: नानासाहेब शांताराम सोनजी पाटील यांचे निधन

पाचोरा (जि. जळगाव): पाचोरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हा अध्यक्ष तसेच एस. एस. पाटील कंट्रक्शनचे संस्थापक व तालुक्यातील प्रमुख उद्योजक नानासाहेब शांताराम सोनजी पाटील यांचे ३१ ऑगस्ट रोजी पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. समाजकारण, राजकारण आणि उद्योगक्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानामुळे पाचोरा-भडगाव परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या जाणीने एक आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
नानासाहेब पाटील हे प्रामाणिकपणा, साधेपणा आणि सेवाभावाचे जिवंत प्रतीक होते. त्यांच्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून पाचोरा तालुक्यात अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. एस. एस. पाटील कंट्रक्शन कंपनीद्वारे त्यांनी स्थानिक विकासाला चालना दिली, तर समाजकारणात ते नेहमी अग्रेसर राहिले. राजकारणातही त्यांनी काँग्रेस पक्षात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आणि पाचोरा नगरपरिषद व जिल्हा परिषदेत त्यांचे योगदान अजरामर आहे. सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नानासाहेब यांच्या निधनाने स्थानिक राजकीय व उद्योग वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या तीनही मुलांनी – संजय शांताराम पाटील, प्रदीप शांताराम पाटील आणि मनोज शांताराम पाटील – वडिलांच्या आदर्शांचे अनुसरण करत उद्योग व्यवसाय सांभाळण्यासोबतच समाजकारण व राजकारणातही सक्रिय भूमिका घेतली आहे. या कुटुंबाने नानासाहेब यांच्या वारशाला पुढे चालवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, ते मोठ्या विश्वासाने व जिद्दीने व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत.
नानासाहेब शांताराम सोनजी पाटील यांच्या जाणीने समाज नेतृत्व, उद्योजक वर्ग, सर्वसामान्य लोक आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना स्थानिक नेते व नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली.