दहावी पास पोलिसाच्या गुन्ह्याचा तपास न्यायाधींशाच्या अभ्यासक्रमात;पाचोरा पोलिस स्टेशनचे हवालदार रमेश कुमावत यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर

वृत्त संकलन राहुल महाजन,संपादक | मधुर खान्देश वृत्तसेवा: पाचोरा दि. २९ एप्रिल २०२५: पाचोरा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले हवालदार रमेश शंकर कुमावत (राहणार: वरखेडी, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांना विशेष गुन्ह्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रतिष्ठेचा महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार १ मे रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हवालदार कुमावत यांनी पोलिस दलात २९ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण केली असून त्यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा-अडावद येथील कलम ३०२ अंतर्गत खून प्रकरणाचा तपास करून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिली. या गुन्ह्याची पुणे सीआयडीनेही दखल घेतली होती. तसेच, जामनेर पोलिस स्टेशन येथील कलम ३०२/३४/२०१ अंतर्गत सरकारी वकिलाच्या खुनाशी संबंधित प्रकरणात सखोल तपास करून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या खटल्याचा निकाल आणि तपास इतका प्रभावी होता की, दिल्ली येथील राष्ट्रीय संशोधन फौजदारी न्याय विभागाने तो एलएलएम (न्यायाधीश) अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी समाविष्ट केला आहे.याशिवाय, नर्स खून खटला प्रकरणात आरोपी नेपाळ देशात पळून जात असताना त्याला अटक करून पुरावे गोळा करत कुमावत यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिली. जिल्ह्यातील अनेक पोलिस स्टेशनांवर खून प्रकरणांमध्ये त्यांनी उत्कृष्ट तपास करून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. हवालदार रमेश कुमावत यांच्या या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात येत आहे. त्यांच्या या यशाबद्दल पाचोरा पोलिस स्टेशनसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे.
• (सदर पदक मिळाल्याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कारवाया,तपास व न्यायाधीशांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या निकाल हे आताच्या नवीन भरती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तसेच अधिकारी वर्गाने आपल्या वाचनात ठेवावे व त्यामधून आपल्या कामाला गती कशी निर्माण करता येईल यासाठी काम करावे अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली आहे.)
• (पोलीस हवालदार रमेश शंकर कुमावत यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत त्यांचे पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने अभिनंदन करतो त्यांची २९ वर्षे झालेली पोलीस खात्यातील सेवा खूप कौतुकास्पद आहे. त्यांच्या अनुभवाचा आम्हाला देखील गुन्हे तपासात व कामकाजात उपयोग होत असतो- दिनेश भदाने,सहाय्यक पोलीस निरीक्षक)
• (पोलिस खात्यात अनेकदा अशा गुन्ह्यामध्ये दडपण येते. राजकीय,तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जातो. अशा परिस्थितीमधून पीडित व्यक्तीस न्याय देण्यासाठी मोठे आव्हाने असतात. गुन्ह्यात काम करताना फार वाईट अनुभव येतात परंतु पोलीस विभागाच्या माध्यमातून नेहमीच पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि यानंतरही करत राहतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे- प्रकाश चव्हाणके,पोलिस उपनिरीक्षक)
• (पोलीस शिपाई म्हणून जेव्हा भरती झालो तेव्हापासून नक्कीच माझ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा मी योग्य फायदा घेत आलेलो पोलीस उपनिरीक्षक आहे. तसेच गुन्हेगारांना कागदावर कसे घ्यायचे आणि क्लिष्ट व गुंतागुंतीच्या गुन्ह्याच्या तपासात मी वैयक्तिक अनेकदा कुमावत दादा यांच्या कडून मार्गदर्शन घेत असतो – परशुराम दळवी, उपनिरीक्षक (पाचोरा पोलिस स्टेशन)