पिंपळगाव पोलिसांच्या माहितीवरून पाचोऱ्यात ऑनलाईन मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; मुख्य आरोपी फरार, मात्र मुद्देमालची चर्चा?

पाचोरा : पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाचोरा शहरातील रामानंद नगर भागातील एका बंद पत्राच्या गोदामात सुरू असलेल्या ऑनलाईन कल्याण मटका अड्ड्यावर धाड टाकली. सुनील देवराम भोई या संशयिताकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पाटील हा स्वतःच्या फायद्यासाठी मोबाईल फोनवर हा जुगार चालवत होता. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता, पोलिसांची चाहूल लागताच तेथील लोक पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ८९,२६० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये ४०,००० रुपये किमतीचे ४ प्रिंटर, ३०,५०० रुपये किमतीचे ६१ मोबाईल संच, ६,००० रुपयांचे प्रिंटर कार्टरेज आणि कॅल्क्युलेटर, पेन, नोटबुक यांसारख्या साहित्याचा समावेश आहे. संशयित आरोपी संतोष पाटील व त्याचे इतर साथीदार पळून गेले असून, पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई केल्याबाबत पोलिसांचे कौतुक करण्यात आले मात्र सदर गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला काही मुद्देमाल परत दिल्याची देखील चर्चा रंगली आहे..(सविस्तर वृत्त….लवकरच)





