पाचोऱ्याचे सुपुत्र गायक किशोर मरसाळे यांना ‘राज्यस्तरीय खान्देश कलाकार पुरस्कार’ जाहीर

पाचोरा: जिद्द, चिकाटी आणि कलेच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या पाचोरा येथील बाहेरपुरा भागातील तरुण गायक किशोर मरसाळे यांना यावर्षीचा मानाचा ‘राज्यस्तरीय खानदेश कलाकार पुरस्कार’ जाहीर झाला आहे. खानदेशचे प्रसिद्ध दिग्दर्शक समाधान मामा बेलदार यांच्यातर्फे हा पुरस्कार १ तारखेला नाशिक येथे प्रदान करण्यात येणार आहे.
किशोर मरसाळे यांचा सांगीतिक प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. ते अवघ्या पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या मातोश्रींनी काबाडकष्ट करून त्यांना लहानाचे मोठे केले. मातंग समाजात जन्मजात लाभलेली सरस्वतीची ओढ किशोर यांच्यातही लहानपणापासूनच होती. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी संगीत क्षेत्रात पाऊल ठेवले.
सुरुवातीला बँड पार्टीमध्ये गाणी गाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंत पोहोचला आहे. त्यांनी आजवर अनेक ऑर्केस्ट्रा, २६ जानेवारीचे कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये आपल्या गायकीने रसिकांची मने जिंकली आहेत. आज संपूर्ण पाचोरा तालुक्यात त्यांची ओळख एक उत्कृष्ट ‘सिंगर’ म्हणून निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर लवकरच नवे गाणे किशोर मरसाळे यांच्या यशाची कमान चढती असून, लवकरच त्यांचे नवीन गाणे सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल पाचोरा परिसरातून आणि कलाकार क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






