जेसीआय पाचोराच्या अध्यक्षपदाचा गौरव अग्रवाल, सचिवपदाचा श्रेणिक बांठिया यांनी स्विकारला पदभार

बनोटीवाला फार्म हाऊस मध्ये दिमाखात रंगला पदग्रहण सोहळा….
शहर प्रतिनिधी / पाचोरा
सामाजिक बांधिलकी, नेतृत्व विकास आणि व्यक्तिमत्व घडवणाऱ्या उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या जेसीआय पाचोरा या नामांकित संस्थेच्या सन २०२६ साठीच्या नूतन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी गौरव अग्रवाल तर सचिवपदी श्रेणिक बांठिया यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड संस्थेच्या सर्वसाधारण सभेत व अंतर्गत निवड प्रक्रियेद्वारे पार पडली. यावेळी जेसीआय पाचोराचे प्रमुख सदस्य, माजी पदाधिकारी व ज्येष्ठ मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील भडगाव रोडवरील बनोटीवाला फार्म हाऊस मध्ये जे. सी. आय. पाचोरा अध्यक्षपदी गौरव अग्रवाल, सचिवपदी श्रेणिक बांठिया, संजना अग्रवाल, शुभम अग्रवाल यांनी पदभार स्विकारला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष पदाचे दावेदार किशोर बारावकर, नगरसेवक संजय गोहील हे उपस्थित होते. यासोबतच अनेक तरुणांनी सदस्य पदाची शपथ यावेळी घेतली. नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, आगामी वर्षात संस्थेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष गौरव अग्रवाल, सचिव श्रेणिक बांठिया यांनी वेळी बोलुन दाखवला. अनुभवी व कार्यतत्पर कार्यकारिणी २०२६ साठी गठीत झालेल्या या कार्यकारिणीमध्ये जीवन जैन, दिनेश बोथरा, रितेश लालवाणी, गोपाल पटवारी, शीतल संचेती, अपूर्व थेपडे, दिनेश अग्रवाल, दिग्विजय पटवारी, अंकित अग्रवाल, मयूर दायमा, अभिनंदन संघवी आणि श्रेयांश लालवाणी या सदस्यांचा सक्रिय सहभाग लाभला. या सर्व सदस्यांनी यापूर्वी विविध सामाजिक, शैक्षणिक व नेतृत्व विकास उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ आगामी उपक्रमांसाठी निश्चितच होणार आहे.
समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य
नूतन अध्यक्ष गौरव अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “जेसीआय पाचोरा ही केवळ संस्था नसून तरुण नेतृत्व घडवणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे. २०२६ मध्ये व्यक्तिमत्व विकास, युवा नेतृत्व, उद्योजकता, सामाजिक उपक्रम, आरोग्य, शिक्षण आणि जनजागृती यासारख्या क्षेत्रांत नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबविण्यावर भर दिला जाईल.” तर सचिव श्रेणिक बांठिया यांनी संस्थेच्या प्रशासनात पारदर्शकता, सदस्यांचा सक्रीय सहभाग आणि नियोजनबद्ध उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल, असे यावेळी स्पष्ट केले.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून पाचोरा शहरात सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढवणे, तरुणांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि सकारात्मक बदल घडवणे, हा संस्थेचा प्रमुख उद्देश राहणार आहे. सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने २०२६ हे वर्ष जेसीआय पाचोरासाठी उल्लेखनीय ठरेल, असा विश्वास यावेळी सर्वानुमते व्यक्त करण्यात आला. पदग्रहण सोहळ्यानंतर मान्यवरांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.






