प्रामाणिकपणाचा विजय! पाचोरा बस स्थानकावर हरवलेली दागिन्यांची पर्स महिलेने पोलिस दादाच्या समक्ष केली परत

पाचोरा: सध्याच्या धावपळीच्या आणि महागाईच्या युगातही माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दर्शन पाचोरा शहरात घडले आहे. पाचोरा बस स्थानकावर हरवलेली सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स एका महिलेने प्रामाणिकपणे मूळ मालकास परत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाचोरा येथील रहिवासी वर्षा एकनाथ चौधरी यांची बस स्थानकावर संभाजीनगर जाण्यासाठी निघाले असताना दागिन्यांची आणि पैशांची पर्स गहाळ झाली होती. पर्समध्ये मौल्यवान दागिने असल्याने चौधरी कुटुंब चिंता व्यक्त करत होते. सदर पर्स पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा येथील रहिवासी लताबाई रवींद्र पाटील यांना सापडली दागिने बघूनही डगमगले नाही मन, पर्स उघडून पाहिली असता त्यात सोन्याचे दागिने आणि मोठी रोकड होती. मात्र, लताबाई पाटील यांनी कोणताही मोह न धरता ही पर्स मूळ मालकापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला असता पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी हरीश गवळी यांच्या समक्ष लताबाई पाटील यांनी वर्षा चौधरी यांना त्यांची पर्स सुपूर्द केली. आपली हरवलेली पर्स सुरक्षित आणि सर्व ऐवजासह परत मिळाल्याने वर्षा चौधरी यांनी लताबाईंचे आभार मानले.
“आजच्या काळात जिथे लोक रुपयासाठी नाती विसरतात, तिथे लताबाईंनी दाखवलेला हा प्रामाणिकपणा समाजासाठी आदर्श आहे.”
— हरीश गवळी (पोलीस कर्मचारी)या कौतुकास्पद कामगिरीबद्दल लताबाई रवींद्र पाटील यांचे पाचोरा तालुका आणि नाचनखेडा परिसरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या कृतीने समाजात प्रामाणिकपणाचा एक मोठा संदेश गेला आहे.





