पाचोरा-भडगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस; ग्राहक सेवा संघाने दिले नगरपालिकेला निवेदन

पाचोरा आणि भडगाव शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. या गंभीर समस्येची दखल घेत पाचोरा-भडगाव तालुका ग्राहक सेवा संघाच्या वतीने नगरपालिकेला निवेदन देऊन त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि सार्वजनिक ठिकाणांवर कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी पाहायला मिळत आहेत. यामुळे लहान मुले, वृद्ध आणि दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी, यासाठी संघटनेने उपनगराध्यक्ष किशोर आप्पा बारवकर तसेच मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले. संघटनेचे मार्गदर्शक डी. एफ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने नगरपालिकेला जाणीव करून दिली की, मोकाट कुत्र्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावेळी ललिताताई कृष्णराज पाटील (अध्यक्ष, ग्राहक सेवा संघ), एकनाथ भाऊ (सरचिटणीस),कैलास अहिरे (सरचिटणीस), वैशालीताई जडे (सदस्य), रंजनाताई पुजारी (सदस्य)
नगरपालिका प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन लवकरच ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. आता नगरपालिका या प्रश्नी नेमकी काय कार्यवाही करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.





