गॅस भाववाढ आणि काळाबाजार विरोधात पाचोरा काँग्रेस आक्रमक; तहसीलदारांना दिले निवेदन

पाचोरा: केंद्र सरकारने केलेली गॅस दरवाढ आणि तालुक्यात सुरू असलेला गॅसचा काळाबाजार याविरोधात पाचोरा तालुका काँग्रेस कमिटीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार यांच्या सूचनेवरून हे आंदोलन छेडण्यात आले. पाचोरा शहर आणि परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यातच केंद्र सरकारने गॅसच्या किमतीत वाढ केल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या दोन्ही मुद्द्यांवर काँग्रेसने प्रशासनाला धारेवर धरले.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार विजय बनसोडे यांना निवेदन दिले. “गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष पथके नेमून कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस स्टाईलने आंदोलन केले जाईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
या आंदोलनाप्रसंगी सचिन सोमवंशी (तालुकाध्यक्ष), शेख इरफान शेख मन्यार,शरीफ शेख, संदीप पाटील,शंकर सोनवणे,प्रवीण पाटील, अण्णा पाटील, चेतन बोदवडे, प्रशांत पाटील, जुगराज भोई, भगवान भोई, राहुल मराठे, दिलदार पठाण व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.





