डोमगावचे सुपूत्र प्रसिद्ध रिल स्टार सोपानजी महाराज यांना ‘राज्यस्तरीय महाराष्ट्र नायक’ पुरस्कार जाहीर

जळगाव-डोमगाव: जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणारे डोमगाव येथील प्रसिद्ध रिल स्टार आणि समाजप्रबोधनकार शि.ह.भ.प. सोपानजी महाराज यांना यावर्षीचा मानाचा ‘राज्यस्तरीय महाराष्ट्र नायक’ पुरस्कार जाहीर झाला आहे. वयाच्या सोळाव्या वर्षापासून सामाजिक आणि कलाक्षेत्रात सक्रिय असलेल्या सोपानजी महाराजांनी आपल्या रोखठोक भाषणी शैलीने आणि अहिराणी रिल्सच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य प्रभावीपणे मांडले आहे. येत्या ३१ मे रोजी नाशिक येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि चित्रपटसृष्टीतील कलावंतांच्या उपस्थितीत त्यांना हा गौरव प्रदान करण्यात येणार आहे. इन्स्टाग्रामवर ‘डोमगावकर महाराज’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोपानजी महाराजांनी अहिराणी भाषेचे स्टार प्रचारक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “प्रसिद्ध होणे सोपे असते, मात्र लोकप्रिय होणे कठीण असते आणि खानदेशी जनतेने मला ते प्रेम दिले आहे.” स्वतःवर असलेल्या अढळ विश्वासामुळेच आजवर अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांवर त्यांनी नाव कोरले आहे. समाजप्रबोधनाचा हा वारसा पुढे नेत असतानाच, भविष्यात चित्रपट निर्मिती करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले असून, त्या दिशेने त्यांच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत.




