पाचोऱ्यातील वाल्मिकी मेहतर समाजाच्या सफाई कारागाराची भक्तीची अनोखी परंपरा; रजा घेऊन कुटुंबासोबत विठुरायाची वारी!

वृत्त संकलन: राहुल महाजन | आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला असून, जागोजागी भक्तीचा पूर ओसांडून वहात आहे. याच विठूमाऊलीच्या ओढीने पाचोरा शहरातील वाल्मिकी मेहतर समाजातील चांगरे कुटुंबाने भक्तीचा एक अनोखा आणि आदर्श वस्तुपाठ समाजासमोर ठेवला आहे. या कुटुंबातील सदस्य मागील सलग सात वर्षांपासून नियमितपणे पंढरपूरची वारी करत असून, त्यांच्या या सातत्याचे आणि विठ्ठल भक्तीचे संपूर्ण तालुक्यातून भरभरून कौतुक होत आहे. पाचोऱ्यातील चांगरे कुटुंबातील लक्ष्मण सुरेश चांगरे, निशा चांगरे, कुणाल चांगरे आणि हिमांशु चांगरे हे संपूर्ण कुटुंब दरवर्षी नित्यनियमाने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाते. आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक युगात संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत वारीची ही वसा आणि वारसा जपल्यामुळे, त्यांच्याकडे एक सामाजिक आदर्श म्हणून पाहिले जात आहे. पाचोरा शहरातील कृष्णापुरी येथून दरवर्षीप्रमाणे ही दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. हरिभक्त पारायण गोविंद महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली निघणाऱ्या या दिंडीला मोठी ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. या अत्यंत जुन्या आणि प्रसिद्ध दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी दरवर्षी भाविकांमध्ये मोठा उत्साह असतो. यंदाही या दिंडीत शेकडो भाविक मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी झाले आहेत.
“ज्ञानोबा माऊली तुकाराम” विठ्ठल नामाचा जयघोष आणि ढोलकी-टाळांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गजर करत हे वारकरी पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाले आहेत. संपूर्ण परिसर या भक्तिमय वातावरणामुळे दुमदुमून गेला आहे. विठुरायाचे मनोभावे दर्शन घेऊन, जगावरील अरिष्ट टळू दे आणि सर्वांना सुखी ठेव, असे साकडे घालत हे वारकरी आपला परतीचा प्रवास करतात. चांगरे कुटुंबाने सातत्याने वारीत सहभागी होऊन दाखवून दिले आहे की, भक्तीला कोणतीही सीमा नसते. केवळ वैयक्तिक सुख न शोधता, संपूर्ण कुटुंबासह अध्यात्माची कास धरणे आणि समाजोपयोगी वारसा पुढे चालवणे, हा आजच्या तरुण पिढीसाठी एक मोठा संदेश आहे. त्यांच्या या भक्तीमय प्रवासासाठी आणि सातत्यासाठी संपूर्ण पाचोरा शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





