नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्यराष्ट्रीय

जळगाव – चांदवडच्या ६५० कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाला भ्रष्टाचाराची ‘ठिगळं’; पाचोऱ्यात हिवरा नदीवरील पुलाचे काम निकृष्ट…वाचा सविस्तर….


Advertisements
Ad 4

(राहुल महाजन,पत्रकार | मधुर खान्देश)

पाचोरा: शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून जनतेच्या सोयीसाठी रस्ते आणि पुलांचे जाळे निर्माण करण्याचे धोरण आखले असले, तरी ठेकेदारांच्या मनमानी आणि निकृष्ट कामांमुळे या चांगल्या धोरणाला हरताळ फासला जात आहे. जळगाव-चांदवड या सुमारे ६५० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गावर पाचोरा शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या हिवरा नदीवरील पुलाची झालेली दुरवस्था याचाच जिवंत पुरावा आहे. सद्यस्थितीत या पुलावर ‘ठिगळ’ लावण्याचे काम सुरू असून, कोट्यवधींचा निधी ठेकेदारांच्या खिशात आणि नागरिकांच्या पदरी मात्र धोकादायक प्रवास, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • नवीन पुलाचे दोनदा तुटले स्लॅब!

काही वर्षांपूर्वीच जळगाव-चांदवड राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी नदी-नाल्यांवर मोठमोठ्या पुलांची उभारणी करण्यात आली होती. नागरिकांना जलद सेवा मिळावी म्हणून प्रशासनाने घाईघाईने हे पूल वाहतुकीसाठी सुरूही केले. मात्र, पाचोरा शहराच्या मध्यभागी असलेल्या हिवरा नदीवरील पुलाचा दर्जा निकृष्ट असून, अवघ्या काही वर्षांतच या पुलाचे दोन ठिकाणी स्लॅब तुटले. आता ते स्लॅब तोडून पुन्हा जोडण्याचे काम (ठिगळ लावणे) सुरू आहे. केवळ याच पुलाची नाही, तर बांबरूड गावाच्या अगोदर असलेल्या पुलाचीही अशीच दुरवस्था झाली असून, त्याचीही अनेकदा दुरुस्ती करावी लागली आहे.

अधिकाऱ्यांच्या त्या ‘ऑडिट’वर संशयाची सुई

६५० कोटी रुपयांच्या या महामार्गाच्या तपासणीसाठी काही दिवसांपूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टीम आली होती. जर इतके मोठे अधिकारी येऊन गेले, तर त्यांनी नेमके कसले ‘ऑडिट’ केले?” असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत हे निकृष्ट काम कसे काय सुटले? की ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे काही ‘अर्थपूर्ण’ साटेलोटे आहे? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.

  • जनतेचा पैसा ठेकेदारांच्या घशात?

शासनाचे रस्ते विकासाचे धोरण निश्चितच कौतुकास्पद आहे, परंतु प्रत्यक्षात काम करणाऱ्या ठेकेदारांची भूमिका अत्यंत नकारात्मक आणि बेजबाबदारपणाची दिसून येत आहे. करोडो रुपये खर्च करूनही जर नागरिकांना काही वर्षांतच उखडलेले रस्ते आणि कमकुवत पूल मिळत असतील, तर या निधीचा फायदा कोणाला? ठेकेदारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आज सर्वसामान्य जनतेला नाहक गैरसोयीचा आणि अपघाताच्या छायेचा सामना करावा लागत आहे.

  • हायवे प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे

या महामार्गावरील पुलांची अवस्था पाहता, येथे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे हायवे प्रशासनाने आतातरी कुंभकर्णी झोपेतून जागे व्हावे. या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदारावर कडक कारवाई करावी आणि पुलाचे काम दर्जेदार करून घ्यावे, अशी मागणी पाचोरा शहर व परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button