
पाचोरा: प्रांताधिकारी यांच्या आदेशाने नेमण्यात आलेल्या विशेष टास्क फोर्सने रात्रीच्या सुमारास अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई केली आहे. मौजे वाक (ता. भडगाव) येथून बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणारे दोन तब्बल १२ चाकी डंपर या पथकाने रंगेहात पकडले. कारवाईनंतर हे दोन्ही डंपर तात्काळ जप्त करण्यात आले असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी ते पाचोरा येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.ही धडक कारवाई मध्यरात्री ठीक २ वाजता वाक (ता. भडगाव) परिसरामध्ये करण्यात आली. पकडण्यात आलेल्या वाहनांपैकी पहिले १२ चाकी डंपर हे विना नंबरचे असून ते आप्पा पाटील यांच्या मालकीचे असल्याची माहिती समोर आली आहे, तर दुसरे डंपर सचिन युवराज काळे यांच्या मालकीचे आहे. या यशस्वी कारवाईत प्रांताधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील मंडळ अधिकारी आर. डी. पाटील व राहुल पवार, तसेच ग्राम महसूल अधिकारी संजय सोनवणे, अतुल पाटील, अविनाश जंजाळे, अजमल शहा मकानदार आणि निखिल बळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात अशीच कडक मोहीम यापुढेही सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.




