आषाढी एकादशी निमित्त शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य सेवा; हजारो भाविकांनी घेतला लाभ

पाचोरा : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पिंपळगाव हरेश्वर येथे चैतन्य बहुउद्देशीय संस्था तसेच शिवसेनेच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा तब्बल १,००० हून अधिक भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान एका भाविकाची अचानक प्रकृती खालावल्याने, आयोजक व शिवसैनिक आकाश चित्ते यांनी कसलाही विलंब न करता तत्परता व प्रसंगवधान दाखवत त्या रुग्णाला स्वतः उचलून तातडीने रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले. त्यांच्या या तात्काळ मदतीमुळे रुग्णावर वेळेत उपचार शक्य झाले. उपस्थितांनी व भाविकांनी आकाश चित्ते यांच्या या संवेदनशील आणि तत्पर सेवेचे विशेष कौतुक केले असून या मोफत वैद्यकीय शिबिरामध्ये डॉक्टरांच्या पथकाने भाविकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार पुरवले. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उपस्थिती दिली होती. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी चैतन्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आकाश चित्ते, वाल्मीक सोनवणे, आकाश पाटील, राजेंद्र पाटील, दिनेश तेली तसेच वैद्यकीय सेवेसाठी डॉ. वाल्मीक धनगर, डॉ. पवन पाटील आणि डॉ. आल्केश तेली यांनी मोलाचे सहकार्य व सेवा योगदान दिले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आरोग्य सेवेचा हा सामाजिक उपक्रम अत्यंत स्तुत्य ठरला असून सर्वस्तरातून आयोजकांचे अभिनंदन होत आहे.





