ॲड. अंकुश कटारे यांचा जळगाव जिल्हा दौरा; अनु. जाती विभागाचे संघटन मजबूत करण्यावर असणार भर

जळगाव:जळगाव जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग (पश्चिम) चे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांचा दिनांक २२ ते २४ दरम्यान विशेष जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु. जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. अनिरुद्ध वनकर आणि जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्षांच्या सूचनेनुसार हा दौरा पार पडणार आहे.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राहुल मोरे तसेच माजी प्रदेश सचिव अनिरुद्ध सावळे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. पश्चिम जळगाव जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये भेट देऊन कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे, अनुसूचित जाती विभागाची संघटन शक्ती वाढवणे तसेच जिल्हा कार्यकारिणी, तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या निवडीबाबत सविस्तर चर्चा करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.
या तीन दिवसीय दौऱ्याचे नियोजन खालीलप्रमाणे असणार आहे:
- दिनांक २२: सकाळी १० वाजता चाळीसगाव, दुपारी २ वाजता भडगाव आणि संध्याकाळी ५ वाजता एरंडोल.
- दिनांक २३: सकाळी १० वाजता अमळनेर, दुपारी २ वाजता धरणगाव आणि संध्याकाळी ५ वाजता पारोळा.
- दिनांक २४: सकाळी १० वाजता पाचोरा आणि संध्याकाळी ५ वाजता जळगाव (ग्रामीण).
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनुसूचित जाती विभागाच्या सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस सरचिटणीस बाबा देशमुख आणि प्रदीप सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.




